घरफोड्या करणारा पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: April 1, 2017 02:24 AM2017-04-01T02:24:27+5:302017-04-01T02:24:27+5:30
कारागृहामधून सुटल्यानंतर शहरात घरफोड्या करणाऱ्याला खडक पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे
पुणे : कारागृहामधून सुटल्यानंतर शहरात घरफोड्या करणाऱ्याला खडक पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला असून, पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
रियाज शाकीर शेख (वय १९, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खडक पोलिसांकडे कुमार भीम जाधव (वय २९, रा. गंज पेठ) यांच्या घरामधून ४५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना रविवारी घडली. हा गुन्हा शेख याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. आरोपीने जाधव यांच्यासह पल्लवी महारुद्र कसबे (रा. गंज पेठ) यांच्या घरामधून सोनसाखळी व रोकड लंपास केली होती. तर, स्वाती बापू डोलारे (वय ३२, रा. एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ) यांच्या घरामधून मोबाईल चोरलेला होता. नाथाबा अंबरनाथ फासगे (वय ३५, रा. लोहियानगर) यांच्या घरामधूनही चोरट्याने एक मोबाईल लंपास केला होता. यासोबतच आणखी तीन गुन्ह्यांची कबुली त्याने दिली आहे.
त्याच्याविरुद्ध एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. तो १४ फेब्रुवारी रोजी येरवडा कारागृहामधून जामिनावर सुटून आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. बारुळकर यांनी १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी आणखी एका अल्पवयीनास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या २ दुचाकी जप्त केल्या आहेत. गाडी चालवण्याचा छंद असल्यामुळे तो वाहने चोरत होता. गाडीतील पेट्रोल संपल्यावर ही वाहने तेथेच सोडून तो निघून जात असे. ही कारवाई उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे यांच्या पथकाने केली.