पाण्याअभावी रब्बी हंगाम गेला वाया; गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 02:22 AM2018-12-12T02:22:18+5:302018-12-12T02:22:49+5:30
केवळ २४ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण
पुणे : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामाला बसला आहे. यावर्षी पाण्याअभावी जवळपास पूर्ण हंगाम वाया गेला आहे. आतापर्यंत ९२ हजार २०८ हेक्टरवरील म्हणजेच केवळ २४ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवडीच्या क्षेत्रात ६० टक्क्यांनी घट झाली आहे. गहू, ज्वारी आणि मक्याच्या क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. यामुळे चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बी हंगामात महत्त्वाची पिके घेतली जातात. ज्वारी, गहू, मका, हरभरा, तृणधान्य, कडधान्य ही प्रमुक पिके या हंगामात घेतली जातात. मात्र, पाणीच नसल्याने शेतकºयांनी लागवडी केल्याच नाहीत. दरवर्षी सरासरी ३ लाख ९१ हजार १४ हेक्टरवर रब्बीची पिके घेतली जातात. मात्र, यावर्षी केवळ ९२ हजार २०८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत २ लाख ३५ हजार २८८ क्षेक्टररील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.
या वर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. तुरळक पावसामुळे पिकांना पाहिजे तसा फायदा झाला नाही. ढगाळ हवामानाचाही या पिकांना फटका बसला. यामुळे हातातोंडाशी आलेले पीकही शेतकºयांना मिळाले नाही. या वर्षी ज्वारीचे सरासरी पेरणीक्षेत्र १ लाख ५७ हजार ८१४ हेक्टर येवढे होते. मात्र, केवळ ६४ हजार ३८ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या लागवडीत जवळपास ५९ टक्क्यांनी घट झाली आहे. गव्हाचे सरासरी पेरणीक्षेत्र ४७ हजार ९७१ हेक्टर होते. या पैकी केवळ ६ हजार ४ हेक्टरवर गव्हाच्या पेरण्या झाल्या. रब्बी तृणधान्य पिकांचे क्षेत्र जवळपास २ लाख २४ हजार ८४९ हेक्टर होते. मात्र, केवळ ७८ हजार ३६६ हेक्टरवर पेरण्या झाल्या. रब्बी कडधान्याच्या लागवडीतही या वर्षी मोठी घट झाली आहे. यामुळे एकंदर हा हंगामच शेतकºयांचा वाया गेल्याने हे वर्ष काढायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कांदा, ऊस पिकांचेही नुकसान
कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. या वर्षी रब्बीच्या कांदा लागवडीच्या क्षेत्रातही घट झाली आहे. गेल्या वर्षी ५० हजार ५७२ हेक्टरवर कांदा लागवडी झाल्या होत्या. यावर्षी २६ हजार ९७२ हेक्टरवर कांदा लागवडी झाल्या. गेल्या वर्षीच्या तूलनेत कांदालागवडीत १९ टक्कांनी घट झाली आहे.
रब्बी हंगामातील ऊस लागवडीचे सरासरी क्षेत्र १ लाख ३० हजार ६३० हेक्टर एवढे होते. गेल्या वर्षी ९२ हजार ११४ हेक्टरवरील ऊस लागवडी पूर्ण झाल्या होत्या. मात्र यावर्षी २९ टक्के म्हणजेच ३८ हजार ११ हे. क्षेत्रावरील पूर्ण झाल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ टक्कांनी उस लागवडीत घट झाली आहे.
चारा पिकांचेही नुकसान
यावर्षी रब्बी हंगामातील चारा पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी २९ हजार ४७९ हेक्टरवर चारापिके लावण्यात आली होती. मात्र, यावर्षी २२ हजार ३०६ हेक्टवर चारापिके लावण्यात आली. चारा पिकांबरोबरच भाजीपाला पिकांचे क्षेत्रही गेल्या वर्षीच्या तूलनेत ४३ टक्यांनी घटली आहे. मसाला पिकांचेही क्षेत्र ५० टक्यांनी घटले आहे.