दिव्यांगांना पदोपदी अडथळ्यांची ‘शर्यत’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 03:28 PM2019-12-03T15:28:02+5:302019-12-03T15:32:06+5:30
शहरात ठिकठिकाणी सहन करावा लागतो त्रास
पुणे : दिव्यांग व्यक्तींना शहरातील अनेक ठिकाणी इच्छा असूनही जाता येत नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. खरं तर प्रत्येक ठिकाणी दिव्यांगाना ये-जा करता येईल, अशी व्यवस्था करण्यासाठी सरकारच्या सूचना आहेत. परंतु, त्याकडे अनेक ठिकाणी दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत काही तक्रार करण्यासाठीची सोयदेखील नसल्याने दिव्यांग व्यक्तींची उपेक्षा होत आहे.
जन्मजात किंवा नंतर अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींना सरकारकडून दिव्यांग म्हणून संबोधले जात आहे. त्यांच्यासाठी अनेक योजनाही सुरू आहेत. प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय इमारती दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी युझर फ्रेंडली असाव्यात, असे बंधनकारक आहे. तसेच खासगी सार्वजनिक ठिकाणेदेखील त्यांना सहजरीत्या वावरता यावे, यासाठी बनविणे आवश्यक आहे. पण अनेक ठिकाणी आजही दिव्यांगांना जात येत नाही. कारण तिथे गेल्यानंतर व्हीलचेअर किंवा स्लोप करण्यात आलेला नसतो. परिणामी दिव्यांगांना निराश होऊन घरी परत जावे लागते.
महापालिकेच्या शहरात शंभरहून बागा आहेत. त्या सर्व बागांमध्ये व्हीलचेअर असेल तर दिव्यांगसुद्धा तिथे जाऊन आनंद लुटू शकतात. पण बºयाच बागांमध्ये अशी व्यवस्था नाही. काही खासगी बागांमध्ये, मंदिरांमध्ये तशी सोय नाही. सारसबाग, महाराणा प्रताप उद्यान, एम्प्रेस गार्डन, मोठमोठे मॉल, वानवडीमधील शिवरकर उद्यान, वडगावशेरीमधील उद्यान अशी अनेक उद्याने आहेत ज्या ठिकाणी व्हीलचेअरची सोय नाही. या ठिकाणी तशी सोय व्हावी, अशी मागणी दिव्यांगांनी केली आहे.
.......
पु. ल. देशपांडे उद्यानात असूनही देतात नकार
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) पु. ल. देशपांडे या उद्यानात व्हीलचेअरची सोय आहे. परंतु, तेथील कर्मचारी मात्र त्याची विचारणा केली असता थेट नाही म्हणून सांगतात. खंर तर या ठिकाणी महापालिकेतर्फे चांगल्या प्रतीची व्हीलचेअर दिलेली आहे. तसेच नुकतीच शिवराय प्रतिष्ठान या संस्थेनेही व्हीलचेअर भेट दिली आहे. तरीदेखील दिव्यांगांना नकार ऐकावा लागतो.
जेव्हा महापालिकेच्या वरिष्ठांना याबाबत फोनवरून विचारणा केली जाते, तेव्हा येथील कर्मचारी व्हीलचेअर आणून देतात. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाºयांनी याबाबत सर्व कर्मचाºयांना दिव्यांगांना व्हीलचेअर उपलब्ध करून दिलीच पाहिजे, अशी सक्त ताकीद देणे आवश्यक आहे.
..........
योग्य सोय नसल्याने बागेत, चित्रपटगृहात, मंदिरात आम्हाला जाता येत नाही. एकटी असेल, तर जाणं अशक्यच असते. पायºया आणि खडबडीत रस्ते आमच्या रस्त्यात आडवे येतात. अगदी कुठे बाहेर वॉशरूमला जायचे झालं तरी उपलब्ध नसते. बस, रेल्वेचे दरवाजे खूप छोटे असतात, त्यातून व्हीलचेअर आत जात नाही. त्यामुळे आम्हाला मदतनीसाला उचलून घ्यावे लागते. बºयाच कॅब व्हीलचेअर घ्यायला नकार देतात, म्हणून खूप त्रास सहन करावा लागतो. - कोमल माळी, दिव्यांग खेळाडू