मौजमजेसाठी रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; वडिलांना मेसेजवरून मागितली ३० हजारांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:36 AM2024-02-21T10:36:51+5:302024-02-21T10:37:12+5:30
मौजमजेसाठी पैशाची गरज असल्याने तसेच सायबर फ्रॉडमध्ये पैसे गमावल्याने स्वत:च अपहरणाचा बनाव रचल्याची त्याने कबुली दिली
धनकवडी: मौजमजेसाठी एका १८ वर्षीय तरुणाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. त्याने वडिलांना मेसेज करून तीस हजारांच्या खंडणीची मागणीही केली. मात्र पोलिसांनी त्याला लोणावळा येथून ताब्यात घेतल्यावर हा बनाव उघड झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण शिक्षण घेत असून तो कात्रजमधील संतोषनगरमध्ये राहायला आहे. सोमवारी (दि. १९) सायंकाळी सहा वाजता तो घरातून बाहेर पडला; मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यानंतर रात्री उशिरा या तरुणाच्या मोबाइलवरून मेसेज आला. त्यानंतर फोनवरून शिवीगाळ करीत ‘जर मुलाला जिवंत बघायचे असेल तर, त्याच्या अकाऊंटला ३० हजार रुपये टाका; नाहीतर....’ असे म्हणत धमकावले. त्यानंतर पैसे टाकल्याच्या एक तासामध्ये मुलाला सोडण्यात येईल. कुठल्या प्रकारचा रिपोर्ट केला तर मुलाची अपेक्षा सोडून द्या. एका तासामध्ये पैसे आले तर ठीक आहे. अभी गुस्सा मत दिखा, तेरे लडके के अकाऊंट में डाल. बोहत हो गया तेरा, अब देख मैं क्या करता हूँ,’ अशी धमकी दिली.
मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच पालकांनी भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने तपासकार्य सुरू केले. तपासकामी पोलिसांचे एक पथक लोणावळ्यात पोहोचले. ते तरुणाला पुण्यात घेऊन आले. त्यांनी सखोल चौकशी केली असता, त्याने मौजमजेसाठी पैशाची गरज असल्याने तसेच सायबर फ्रॉडमध्ये पैसे गमावल्याने स्वत:च अपहरणाचा बनाव रचल्याची त्याने कबुली दिली.ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक शशिकांत कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रविवारीच खंडणीसाठी एका १२ वर्षांच्या मुलाचे ७० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते. पोलिसांनी त्याची कास पठाराच्या जंगलातून सोमवारी सुखरूप सुटका केली. यावेळी अपहरण करून पळून गेलेल्या आरोपींच्या मागावर एक पथक होते. त्यांनी मंगळवारी आरोपी राजेश शेलार याला अटक केली असून दाखल गुन्ह्यातील सखोल तपासासाठी सात दिवस पोलिस कस्टडीचा रिमांड मिळण्यास विनंती केली आहे.