लाचखोर सुरक्षारक्षक जाळ्यात
By admin | Published: June 4, 2017 05:30 AM2017-06-04T05:30:04+5:302017-06-04T05:30:04+5:30
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सुरक्षारक्षकास ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी पकडले.
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सुरक्षारक्षकास ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी पकडले. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.
संतोष संभाजीराव पवार (वय ४४, रा. दामोदर सोसायटी, लेन नं.४, रो हाऊस नंबर २, नवग्रह मारुती मंदिराजवळ, बिबवेवाडी) असे संशयिताचे नाव आहे. सुरक्षा एजन्सी चालकास पवार यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती. पालिका भवनासमोरील एका हॉटेलमध्ये किशोर गिरमे या साथीदाराकरवी ४ लाख रुपये स्वीकारताना दोघांना पकडण्यात आले.
याबाबत ज्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, त्यांची सुरक्षा एजन्सी असून, त्यांच्याकडे असलेले सुरक्षा कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट संपले आहे. नवी टेंडर प्रकिया राबविण्यासाठी मुदतवाढ देण्याचा अहवाल पाठविण्याचे अधिकार संतोष पवार यांच्याकडे होते. त्यासाठी पवार यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती.
१० लाख रुपयांपैकी पहिला हप्ता ४ लाख रुपये स्वीकारण्याचे त्याने कबूल केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक जगदीश सातव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.