Pune: येरवडा कारागृहात गुंडांच्या टोळ्यांमध्ये राडा; तब्बल १६ कैद्यांवर गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: June 20, 2023 11:03 AM2023-06-20T11:03:35+5:302023-06-20T11:04:32+5:30
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी १६ कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे....
पुणे : क्षमतेपेक्षा दुप्पट, तिप्पट संख्येने एकेका बरॅकीत भरलेल्या कैद्यांमुळे त्यांच्यात परस्परात वाद, मारामार्या सातत्याने सुरु असतात. येरवडा कारागृहात अशाच एका बरॅकमधील कैद्यांमध्ये वर्चस्ववादातून जोरदार हाणामारी झाली. त्यात त्यांनी एकमेकांवर दगड, पत्र्याचा तुकडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. रावण गँग, चिखली, वारजे रामनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या टोळ्यांमधील हे कैदी आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी १६ कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश शांताराम येवले, विजय चंद्रकांत विरकर, सचिन शंकर दळवी, मुकेश सुनिल साळुंखे, गणेश वाघमारे, आदित्य नानाजी चौधरी, किरण रमेश गालफाडे, आकाश उत्तम शिनगारे, विशाल रामधन खरात, रुपेश प्रकाश आखाडे, रोहित चंद्रकांत जुजगर, शुभम गणपती राठोड, अनुराग परशुराम कांबळे, मेहबुब फरिद शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत.
ही हाणामारी येरवडा कारगाृहातील सर्कल ३ परिसरातील बरॅक ८ मध्ये सोमवारी सकाळी १० ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत तुरुंगाधिकारी हेमंत गोविंदराव इंगोले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता सध्या २ हजार ५२६ इतकी आहे. त्या ठिकाणी सध्या ६ हजार ४८४ कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यात न्यायालयीन कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एकेका बरॅकीत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी आहेत. त्यामुळे झोपण्याच्या जागेपासून अंघोळ, स्वच्छतागृहात जाणे अशा छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्यात वादावादी होत असतात.
हे वेगवेगळ्या टोळ्यांमधील गुन्हेगार आहेत. सोमवारी सकाळी अशाच छोट्या मोठ्या वादाचे मोठ्या हाणामारीत रुपांतर झाले. या कैद्यांनी एकमेकांना तेथील दगड, पत्र्यांचा तुकडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार पाहताच तुरुंगातील रक्षकांनी त्यांना बाजूला घेऊन हाणामारी थांबविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कैदी किरकोळ जखमी झाले आहेत. येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत.