भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
By admin | Published: March 28, 2016 03:21 AM2016-03-28T03:21:56+5:302016-03-28T03:21:56+5:30
कार्यक्रमाच्या ठिकाणी नेत्यांचे फलक लावल्याच्या कारणावरून भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. चिखलीतील सानेवस्ती येथे रविवारी सायंकाळी साडेपाचच्या
चिखली : कार्यक्रमाच्या ठिकाणी नेत्यांचे फलक लावल्याच्या कारणावरून भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. चिखलीतील सानेवस्ती येथे रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पक्षातील ज्येष्ठांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण मिटले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील साने चौकात शिवजयंती उत्सवानिमित्त भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी कोणीही पक्षाच्या नेत्याचा किंवा पक्षाचा फलक कार्यक्रम स्थळी न लावण्याचे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ठरले होते. असे असतानाही एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे फलक लावले. यावर दुसऱ्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांना पक्षाच्या फलक काढण्याची विनंती केली. मात्र, विनंती करूनही फलक न काढल्याने दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.
कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीत एक जण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समजूत घातल्यानंतर वातावरण निवळले. याबाबत पोलिसांना विचारले असता, वादावादी झाल्याच्या प्रकरणास त्यांच्याकडून दुजोरा देण्यात आला. (वार्ताहर)