Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन संघटनांमध्ये राडा; १३ जणांवर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: November 2, 2023 05:26 PM2023-11-02T17:26:51+5:302023-11-02T17:27:56+5:30
चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिलीस असून १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये सभासद नोंदणीवरून हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन संघटनांनी परस्पर विरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवारी (१ नोव्हेंबर) रोजी दुपारी बाराच्या सुमारास विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीन जवळ घडली.
याप्रकरणी सोमनाथ गोविंद निर्मळ (३२, रा. सांगवी) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव संगप्पा रंगा, आनंद सुखदेव फुसनर, हर्षवर्धन फरफुडे, अनिल ठोंबरे, अंकिता पवार, श्रेया संजय चंदन, सिद्धेरनागेश्वर लाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेचे अध्यक्ष आहेत. फिर्यादी हे त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत सभासद नोंदणी करत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महादेव संगप्पा रंगा आणि त्यांचे सहकारी हे लाठीकाठ्या सोबत घेऊन येथे काय करता असे म्हणून फिर्यादी यांना दमदाटी करत होते. यावेळी फिर्यादी यांनी सभासद नोंदणी करत असल्याचे सांगितले असता महादेव रंगा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टेबल उलटून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
दरम्यान महादेव संगप्पा रंगा यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यानुसार अक्षय गोविंद निर्मळ, अभिषेक मारुती शिंदे, गणेश बाळू जानकर, सोमनाथ गोविंद निर्मळ, अस्मिता धावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर सहमंत्री आहेत. फिर्यादी हे सहकाऱ्यांसोबत नाष्टा करण्यासाठी गेले असता सोमनाथ निर्मळ आणि त्याचे सहकारी पावत्या फाडत होते. यावेळी फिर्यादी यांनी विचारणा केली असता तुम्हाला काय करायचे, आमच्या कामात तुम्ही पडू शकत नाही नाही असे बोलून शिवीगाळ करून एकाने झेंड्याच्या काठीने कपाळावर मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या मैत्रिणीला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गाडेकर करत आहेत.