पीएमपीच्या सीईओंच्या कार्यालयात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:46+5:302021-06-05T04:09:46+5:30
पुणे : पालिकेतील सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकाने दिलेल्या पीएमपीएमएलच्या संचालकपदाच्या राजीनाम्यामुळे पक्षात वाद उफाळून आलेला असतानाच शुक्रवारी याच विषयावरून महापौर ...
पुणे : पालिकेतील सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकाने दिलेल्या पीएमपीएमएलच्या संचालकपदाच्या राजीनाम्यामुळे पक्षात वाद उफाळून आलेला असतानाच शुक्रवारी याच विषयावरून महापौर आणि त्यांच्या समर्थकांनी पीएमपी कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप आहे. १ जून रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त आणण्याकरिता पीएमपी कार्यालयात गेलेल्या समर्थकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संगणकात छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार स्वारगेट पोलीस ठाण्यात केली आहे. तर, महापौरांच्या समर्थकांनी सीईओ राजेंद्र जगताप यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे.
भाजप नगरसेवक शंकर पवार यांनी नुकताच संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देण्यास सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले होते. त्यानुसार हा राजीनामा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडून महापौरांकडे आला होता. तो पुढे पीएमपीकडे दिला. मात्र, १ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महापौरांनी या अर्जाच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत राजीनामा नामंजूर करीत संचालक मंडळाकडे नव्याने देण्याची सूचना केली. त्यावरून सभागृह नेते बिडकर आणि महापौर मोहोळ यांच्यामध्ये बुधवारी जोरदार खडाजंगी झाली होती.
‘पीएमपी’च्या कर्मचा-यांना महापौर व इतरांकडून कार्यालयाची तोडफोड करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
----
पीएमपी संचालक मंडळाच्या १ जून रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. मी शंकर पवार यांच्या दालनामध्ये बसलो होतो. राजेंद्र जगताप कार्यलयात नव्हते. बैठकीचे इतिवृत्त त्यांच्या घरी असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यामार्फत पाठवितो असे सांगितले. दोन कार्यकर्ते त्याकरिता थांबले. मी लगेच पीएमपी कार्यालयातून निघून गेलो. यानंतर दोन तासांनी या ठिकाणी पोलीसच आले. या ठिकाणी उपस्थितांनी योग्य भाषेचा वापर केला नाही. राजेंद्र जगताप यांनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली, धमकी दिली.
- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे