मतदारांची मोफत वाहतूकही रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 01:47 AM2019-03-12T01:47:44+5:302019-03-12T01:47:56+5:30

नागरिक करू शकतील तक्रार; सी व्हिजिल अ‍ॅपचा वापरण्याचे आवाहन

Radar on the free transport of voters | मतदारांची मोफत वाहतूकही रडारवर

मतदारांची मोफत वाहतूकही रडारवर

Next

पुणे : मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे, मद्य, मौल्यवान वस्तूंच्या वाटपाबरोबरच मतदार केंद्रापर्यंत मोफत वाहन व्यवस्था करणे देखील आचारसंहिता भंगाच्या कक्षेत येते. या आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने सी व्हिजिल अ‍ॅप तयार केले असून, स्मार्ट फोनच्या माध्यमातून एका क्लिकवर तक्रार करता येईल. या तक्रारींवर शंभर मिनिटांत कारवाई केली जाणार आहे.

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश सोमवारी (दि. ११) अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यावेळी उपस्थित होत्या. दरम्यान, जिल्हा माहिती कार्यालयाने आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी नागरिकांनाही तक्रार देता येऊ शकते, याची माहिती दिली.

आदर्श आचारसंहिता भंग झालेल्या घटनेचे एक छायाचित्र अथवा दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागेल. ही माहिती भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जी.पी.एस.) स्वयंचलीत स्थान मॅपिंगसह अ‍ॅपवर अपलोड करावी लागेल. अ‍ॅप वापरकर्त्याला आपली ओळख लपवून देखील तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित तक्रार अवघ्या पाच मिनिटांतच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल.

तक्रारीचा आढावा घेण्यासाठी एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठविण्यात येईल. त्या नुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या ‘जीव्हीआयजीआयएल अन्वेषक’ नामक जीआयएस-आधारित मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या १५ मिनिटाच्या आत पोहोचणे अपेक्षीत आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

...या कारणांसाठी करता येईल तक्रार
मतदारांना पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचे वाटप
शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर
मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या घटना
जमावाला चिथावणीखोर भाषण देणे
पेड न्यूज आणि फेक न्यूज
मतदारांना अमिष म्हणून वस्तूंचा वापर
मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक
उमेदवाराची मालमत्ता, अपात्रते संबंधी

सी व्हिजिल अ‍ॅपबाबत...
‘सी-व्हिजिल’चा उपयोग केवळ निवडणूक होत असलेल्या राज्यांच्या भौगोलिक सीमा अंतर्गतच करता येईल
अ‍ॅप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंची अपलोड करण्याची परवानगी नसेल
अ‍ॅपवरून क्लिक केलेले फोटो अथवा व्हिडिओ फोन गॅलरीमध्ये जतन होणार नाही
‘सी-व्हिजिल’चा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जाणार
१८००१११९५० हा टोल फ्री क्रमांक अथवा राज्य संपर्क केंद्रावर १९५० या क्रमांकावर कॉल करता येईल

Web Title: Radar on the free transport of voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.