नदीपात्रात पाण्यापेक्षा राडारोडाच

By admin | Published: December 20, 2014 11:41 PM2014-12-20T23:41:13+5:302014-12-20T23:41:13+5:30

जपानची मदत घेऊन नदीच्या संवर्धनासाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यास सज्ज असलेल्या महापालिका प्रशासनाकडून मात्र नदीचे अस्तित्वच धोक्यात आणत असलेल्या प्रकाराकडे डोळेझाक केली जात आहे.

Radarodach than water in the river bed | नदीपात्रात पाण्यापेक्षा राडारोडाच

नदीपात्रात पाण्यापेक्षा राडारोडाच

Next

सुनील राऊत ल्ल पुणे
जपानची मदत घेऊन नदीच्या संवर्धनासाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यास सज्ज असलेल्या महापालिका प्रशासनाकडून मात्र नदीचे अस्तित्वच धोक्यात आणत असलेल्या प्रकाराकडे डोळेझाक केली जात आहे. मुठा नदीवरील वारजे पूल ते म्हात्रे पुलापर्यंत कर्वेनगरच्या बाजूस असलेल्या नदीपात्रात रातोरात बांधकामाचा शेकडो टन राडारोडा आणि खोदलेल्या मातीचे डोंगर उभे केले जात आहे.
नदी पात्राच्या बाजूचे सहा ते सात फूट पात्र या राडारोड्याने भरल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे एका बाजूचे नदीपात्र दिवसेंदिवस या ढिगाऱ्याखाली जात असून, त्यामुळे नदीची वहनक्षमता घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, हा प्रकार डोळ्यांदेखत घडत असतानाही डोळ्यांवर कातडी ओढून घेतलेल्या महापालिकेस आणि पाटबंधारे विभागास जाग कधी येणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नदीपात्राच्या या बाजूस अनेक रिकाम्या जागा आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांत या जागांचे भाव गगनाला भिडल्याने या परिसरात मोठमोठी अपार्टमेंट्स उभी राहत आहेत. त्यातच हा भाग शहरापासून थोडासा अलिप्त असल्याने तसेच फारशी वर्दळ नसल्याने रात्रीच्या अंधारात या भागातील नदीपात्राच्या सुमारे दीड किलोमीटरच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बांधकामांचा राडारोडा टाकला जात आहे. तसेच नवीन बांधकामांसाठी खांदण्यात आलेल्या पायाची मातीही टाकली जात आहे. काही महिन्यांपूर्वी हे काम रात्रीच्या अंधारात पार पाडले जात होते. मात्र, आता थेट दिवसाही या राडारोड्याने भरलेले ट्रक या ठिकाणी टाकले जात असल्याचे दिसून येते.

नदीपात्राचा परिसर पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असला, तरी त्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. या परिसरात तसेच शहरात इतरत्र सुरू असलेल्या बांधकामांचा राडारोडा संबंधित व्यावसायिक कोठे टाकतो, याची कोणतीही नोंद पालिका प्रशासन ठेवत नाही. तसेच, त्याचे काय होते, हे पाहण्याची साधी तसदीही घेत नाही.

विशेष म्हणजे ज्या नदीच्या परिसरात हा राडारोडा टाकला जातो. तिथे महापालिकेची स्मशानभूमी तसेच विसर्जन घाटही आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे अनेकदा येणे-जाणे असते. तर नदीपात्रातील रखडलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांपासून अतिरिक्त आयुक्त आणि पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनीही अनेकदा पाहणी केलेली आहे. मात्र, तरीही प्रशासनास हा प्रकार दिसत कसा नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अतिक्रमणाने पुराचा धोका
नदीपात्रात पडणाऱ्या या हजारो टन बेसुमार राडारोड्यामुळे नदी एका बाजूने कमी कमी होत आहे, तर दुसऱ्या बाजूस आधीच रस्त्यासाठी रिटेनिंग वॉल बांधल्याने ते कमी झाले आहे. परिणामी, धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर नदीची असणारी नैसर्गिक वहन क्षमता संकुचित होत असून, पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते.

नदीपात्राचा स्वच्छतागृहासाठी वापर
या परिसरात सुरू असलेल्या अनेक बांधकामांच्या ठिकाणी कामगाराच्या वस्त्या आहेत. त्यात तीनशे ते चारशे मजूर या परिसरात वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची सोय नसल्याने तर असल्यास ते कामगार वापरत नसल्याने शेकडो कामगार सकाळच्या सुमारास नदीपात्राचा वापर चक्क प्रातर्विधीसाठी करतात. त्यामुळे नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.

वंदना चव्हाण यांची आयुक्तांकडे तक्रार
पुणे : संभाजी पुलाखाली तसेच संभाजी पोलीस चौकीच्या मागे ट्रकमधून आणून मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला होता. हा राडारोडा जेसीबीच्या साह्याने नदीपात्रात पसरण्याचे काम सुरू असून, हे काम तत्काळ थांबविण्याची मागणी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली. त्यानंतर तत्काळ हे काम थांबविण्याचे
आदेश महापालिका आयुक्तांनी
दिले. शनिवारी सांयकाळी
खासदार चव्हाण या दिल्लीहून परत आल्या.
या वेळी टिळक रस्ता येथील पक्ष कार्यालयात जात असताना, संभाजी पूलावरून त्यांना नदीपात्रात पसरण्यात येत असलेल्या या राडारोड्याचा प्रकार दिसून आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ महापालिका आयुक्त तसेच नगर अभियंते प्रशांत वाघमारे यांना ही माहिती कळविली. त्यावर तत्काळ काम थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Radarodach than water in the river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.