रेडिओलॉजिस्टचा बेमुदत संप
By admin | Published: June 15, 2016 05:25 AM2016-06-15T05:25:45+5:302016-06-15T05:25:45+5:30
रेडिओलॉजिस्टवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी राज्यभरातील रेडिओलॉजिस्टनी आज संप पुकारला होता. यासाठी मंगळवारी सकाळी महापालिकेवर मोर्चा नेण्यात
पुणे : रेडिओलॉजिस्टवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी राज्यभरातील रेडिओलॉजिस्टनी आज संप पुकारला होता. यासाठी मंगळवारी सकाळी महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला होता. पुण्यात हा संप बेमुदत चालू राहणार असल्याचेही यानिमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
डॉ. आशुतोष जपे यांच्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा संप करण्यात येत असल्याचे इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनचे राज्याचे समन्वयक डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी सांगितले. या वेळी इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश चांडक, खजिनदार डॉ. समीर गांधी, पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लाच्यान, डॉ. हिमानी तपस्वी आदी उपस्थित होते.
डॉ. जपे हे निर्दोष असून, महापालिका त्यांच्यावर केलेली कारवाई मागे घेत नाही, तोपर्यंत शहरातील सर्व रेडिओलॉजिस्ट सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे सेवा बंद ठेवतील. याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास सोमवारपासून (दि.२०) राज्यातील नऊ हजार रेडिओलॉजिस्टदेखील या बेमुदत संपात सहभागी होतील, अशी माहितीही डॉ. ठक्कर यांनी दिली. महापालिका करत असलेली कारवाई ही बेकायदेशीर असून, त्याविरोधात महाराष्ट्रातील नऊ हजारांहून अधिक रेडिओलॉजिस्ट मंगळवारी बेमुदत संपावर गेले होते.
डॉ. आशुतोष जपे यांच्या केंद्रातील सोनोग्राफी मशिनसह सर्व सेवा देणाऱ्या मशीन्सचे सील काढावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. डॉ. ठक्कर म्हणाले की, कायद्यातील जाचक तरतुदींमुळे आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रामाणिक डॉक्टरांवर अन्याय होत आहे. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी पुराव्याअभावी डॉ. जपे यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. आजवर ५२ डॉक्टरांवर अशा प्रकारे अन्याकारक कारवाई झाली आहे.
(प्रतिनिधी)
रेडिओलॉजिस्ट केलेल्या प्रत्येक सोनोग्राफीच्या रिपोर्टसची अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नोंद होत असते. मात्र, तरीही अधिकारी कायद्याचा आणि अधिकारांचा गैरवापर करून किरकोळ चुकींसाठी प्रामाणिक डॉक्टरांवर कारवाई करीत आहेत. कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी स्टिंग आॅपरेशन सक्तीचे करावे. पालिकेतील अधिकारी व आयुक्त आम्हाला आमचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ देत नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही नेमके कोणाकडे जायचे, असा प्रश्न आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे तक्रारस्वरूपात निवेदनही केले आहे.
- डॉ. गुरुराज लाच्यान