मुळा-मुठा वाळूमाफियांनी पोखरली
By admin | Published: March 22, 2017 02:58 AM2017-03-22T02:58:03+5:302017-03-22T02:58:03+5:30
दौंड तालुक्याला लाभलेला मुळा-मुठा आणि भीमा नदीचा विस्तीर्ण प्रदेश वाळूमाफियांनी पोखरून काढला आहे. यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे
दौंड : दौंड तालुक्याला लाभलेला मुळा-मुठा आणि भीमा नदीचा विस्तीर्ण प्रदेश वाळूमाफियांनी पोखरून काढला आहे. यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यात या नद्यांमध्ये पुण्यातील दूषित पाणी सातत्याने सोडले जात असल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांपासून या नद्यांची लचकेतोड सुरू आहे.
दौंड तालुक्यातला भीमा आणि मुळा-मुठा नद्यांचे वरदान लाभले आहे. या नद्यांच्या काठचा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. मात्र प्रदूषण आणि वाळूमाफियांमुळे या नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यांत्रिकी पद्धतीने बेसुमार वाळूउपसा करून नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे नदीच्या प्रवाहात बदल होण्याची शक्यता आहे. पूर्वी नदीच्या काठावर झाडेझुडपे असायची, मात्र वाळूमाफियांनी वाळूचोरीसाठी झाडेझुडपे तोडून त्या ठिकाणी चोरलेल्या वाळूचे डोंगर उभे केलेले आहेत. सातत्याने नदीकाठी वाळूचे डोंगर दिसून येतात.
महिला नदीच्या तीरावर धुण्या-भांड्यांसाठी गेल्यानंतर नदीच्या पाण्यात हात घातल्यास हाताला पुरळ आणि खाज सुटते. एकंदरीतच विविध कारणांनी नदीचे प्रदूषण झाले आहे. मात्र नदीचे विद्रूपीकरण वाळूमाफियांमुळेझाले असल्याची वस्तूस्थिती नाकारून चालणार नाही.