वाहतूककोंडीने चाकणकर रडकुंडीला
By Admin | Published: January 13, 2017 02:09 AM2017-01-13T02:09:25+5:302017-01-13T02:09:25+5:30
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूककोंडीने चाकणकर नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले असून
चाकण : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूककोंडीने चाकणकर नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले असून, चाकणमधील वाहतूककोंडी थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत असल्याने चाकणला उड्डाणपुलासह रस्त्याचे नव्याने रुंदीकरण करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाढती लोकसंख्या, परप्रांतियांचे आक्रमण, वेगाने वाढणारी रहदारी, अपुरे पडणारे रस्ते, सर्वसामान्याना भंडावून सोडणारे अतिक्रमण, चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले उड्डाणपूल व उद्योगाची पंढरी समजल्या जाणाऱ्या छोट्या-मोठ्या कारखान्यांमुळे येथील चौकाचौकांत वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे चाकणकरांचा श्वास गुदमरत असून, वाढत्या वाहतूककोंडीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील आंबेठाण चौकालगत व तळेगाव चौकालगत बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलाचा रहदारीसाठी काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. शहरातील रस्ते पूर्णपणे खड्ड्यात गेल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चाकण-तळेगाव रस्त्यावर महाळुंगे गावाच्या हद्दीत ब्लॅक अँड डेकर बजाज व कला जनसेट कंपनीसमोर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे तळेगाव रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला असून वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. (वार्ताहर)
अपुरे रस्ते, सिग्नलयंत्रणा नादुरुस्त, चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले उड्डाणपूल तसेच दिशादर्शक फलकाचा अभाव आदींमुळे सुपातील केव्हा जात्यात जातील, याचा थांगपत्ता लागत नाही, त्यामुळे चाकणकरांच्या अस्तित्वाचा व अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्ते दुरूस्त करू, नव्याने उड्डाणपूल बांधू, वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवू, असे नुसते आश्वासनाचे गाजर दाखवले जाते आहे. मात्र प्रत्यक्षात याची दखल घेतली जात नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
चाकण-तळेगाव चौक हा पुणे-नाशिक महामार्ग व मुंबई ते अहमदनगर या रस्त्याला जोडणारा महामार्ग आहे. मात्र रस्त्यांचे रुंदीकरण व चुकीच्या उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी केव्हा होईल, याचा थांगपत्ता लागत नाही.
हे उड्डाणपूल असून अडचण, नसून खोळंबा, अशी स्थिती असल्याने महामार्गावरील रस्त्यांवर चाकणच्या हद्दीत नव्याने मोठे उड्डाणपूल बांधावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.