रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करावा, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 02:04 PM2022-05-03T14:04:21+5:302022-05-03T14:09:29+5:30
रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती पोलिसांनी यापूर्वीच न्यायालयाला केली आहे...
पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करावा, मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन केली. दरम्यान, रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती शिवाजीनगर पोलिसांनी यापूर्वीच न्यायालयात केली असून, न्यायालयाने ही बाब न्याय व विधि विभागाकडे पाठविली आहे.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. कुचिक यांनी जामिनाच्या अटीशतींचा भंग केल्याने त्याचा जामीन रद्द करावा, अशी विनंती वाघ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन केली.
त्यांच्यासमवेत भाजप शिवाजीनगर महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. अर्पणा गोसावी, अॅड. ईशानी जोशी, अर्पणा कुऱ्हाडे, सुप्रिया खैरनार, सुनीता जाधव, सोनाली भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.
या प्रकरणात या पीडित महिलेने आपल्याशी कसा संपर्क साधला व तिला आपण कशी मदत केली, हे चित्रा वाघ यांनी सांगितले. तिच्यावर दबाव असल्याने आपल्या नावाची खोटी तक्रार दिल्याचे तिचे मेसेज यावेळी चित्रा वाघ यांनी पोलिसांना सादर केले. रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती पोलिसांनी यापूर्वीच न्यायालयाला केली आहे.
पीडितेला धमक्या-
चित्रा वाघ यांनी सांगितले की, कुचिक यांनी या प्रकरणी मीडियाला काही अशी सांगू नये, तसेच पीडित महिलेशी संपर्क साधून दबाव टाकू नये, अशा अटी घातल्या होत्या, तरीही त्यांनी पीडितेशी संपर्क साधून तिला धमक्या दिल्या, मीडियाला माहिती दिली.