कपड्यांऐवजी व्यापारी महिलेला पाठवल्या चिंध्या, ३ लाखांच्या फसवणूकीप्रकरणी गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: September 11, 2023 01:27 PM2023-09-11T13:27:47+5:302023-09-11T13:34:22+5:30
चिंध्या पाठवल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
पुणे : मोठ-मोठ्या कपड्यांच्या फॅक्टरीमधून कमी किंमतीत कपड्यांची डिलिव्हरी देतो, असे सांगून एका महिला कपडा व्यापाऱ्याची ३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिला व्यापाऱ्याला कपड्यांऐवजी चिंध्या पाठवल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जास्मिन अतुल पुरी (३५, रा. वडगाव शेरी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे, त्यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, एका व्यक्तीने त्यांना मोबाइलवरून संपर्क साधत आपण एका कापड कंपनीच्या डिलिव्हरी एजंटचे काम करतो, तसेच माझे मोठ-मोठ्या कपड्यांच्या फॅक्टरीशी चांगले संबंध आहेत, इतर कपड्यांच्या एजंट पेक्षा कमी किमतीत कपड्यांची डिलिव्हरी देतो, असे सांगून पुरी यांच्याकडून २ लाख ९७ हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून घेतले. त्यानंतर आलेले पार्सल उघडून बघितले असता, त्यात कपड्यांऐवजी चिंध्या असल्याचे पुरी यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक लांडगे करत आहेत.