राहुलचा बंगळुर, बंगाल, चंदीगड, दिल्ली असा प्रवास; लोकेशन ट्रेस करत पोलिसांनी घेतला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 08:09 PM2023-06-23T20:09:43+5:302023-06-23T20:10:27+5:30
नातेवाईकांनी परराज्यात गेल्याचे कारण विचारले असता, मित्रासोबत भांडण झाल्याने पुणे सोडल्याचे खोटे राहुलने सांगितले
पुणे : लग्नाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या दर्शना पवारची हत्या करून फरार झालेला आरोपी राहुल हंडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ही अटकेची कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. पोलिसांपासून वाचण्यासाठी राहुलने बंगळुर, बंगाल, चंदीगड, दिल्ली असा प्रवास केला. त्याचे लोकेशन पोलिस ट्रेस करत होते. मात्र तो हाती लागत नव्हता. अखेर मुंबईत परत आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला राहुलचे लोकेशन पुण्यातील कात्रज येथे दिसून येते होते. त्यानंतर तो राज्याच्या बाहेर गेल्याचे देखील पोलिस तपासात उघड झाले. बंगळूर येथून त्याने एटीएममधून पैसे काढून तो बंगालमधील कलकत्ता येथे गेला. तेथून त्याने आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मित्रासोबत भांडण झाल्याचे सांगत आपण पुणे सोडल्याची माहिती त्याने देत फोन बंद केला. त्यानंतर तो चंदीगड, दिल्ली असा प्रवास केला. पुढे तो मुंबईत परत येत असताना पोलिसांनीनी त्याला सापळा रचून मुंबईतील अंधेरी येथून अटक केली.
नातेवाईकांना सांगितले खोटे कारण
अचानक पुणे सोडून राहुल परराज्यात गेल्याचे कारण त्याला त्याच्या नातेवाईकांनी विचारले. तेव्हा मित्रासोबत भांडण झाल्याने आपण पुणे सोडल्याचे खोटे कारण सांगितले. तसेच पुढे काही न बोलता सरळ फोन बंद करून ठेवला. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले असता ते कोलकत्ता येथे दिसून आले.
पोलिस तपासात काय आढळले
- राहुल दर्शनाला फिरायला राजगडावर घेऊन गेला
- १२ जूनला सकाळी ८:३० ला गडावर दोघे जाताना दिसले
- सकाळी १०:४५ ला एकटाच मोटारसायकलवरून परत येताना दिसला
- बंगळुरू येथील एटीएममधून पैसे काढले
- कोलकाता, चंडीगड येथे लोकेशन आढळले
- काही नातेवाइकांच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास
- अंधेरी रेल्वे स्टेशनवर पकडले