दौंडला भीमा-पाटसचा मुद्दा राहुल कुल यांना भोवला
By admin | Published: February 25, 2017 02:15 AM2017-02-25T02:15:36+5:302017-02-25T02:15:36+5:30
दौंड तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत रासपाचे आमदार राहुल कुल यांचा झालेला दारुण पराभव पाहता राहुल कुल यांनी
मनोहर बोडखे , दौंड
दौंड तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत रासपाचे आमदार राहुल कुल यांचा झालेला दारुण पराभव पाहता राहुल कुल यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांची नाळ असलेला भीमा-पाटस कारखाना सुरू केला तरच कुलांचे राजकीय अस्तित्व टिकेल, कारखाना सुरू झालाच नाहीच तर कुलांना मात्र राजकीयदृष्ट्या पिछाडीवर जावे लागेल. परिणामी त्यांच्या हाती असलेली सत्तादेखील गमाविण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला या निवडणुकीत मिळालेले यश पाहता, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारांना गृहित न धरता त्यांची परतफेड विकासकामातून केली तरच भविष्यात राष्ट्रवादीला भवितव्य आहे.
कुल आणि थोरात यांच्याभोवती आजपर्यंत तालुक्यातील राजकारण फिरत आहे. याचे उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कुल थोरात यांचा चढ-उताराचा आलेख. भारतीय जनता पार्टीला तिसरा पर्याय म्हणून तालुक्यातील जनतेने दौंड नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी संधी देण्यास सुरुवात केली होती. नगराध्यक्षापदाच्या उमेदवार डॉ. जयकुंवर भंडारी यांनी थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत कुठलीही आर्थिक चर्चा न करता मिळालेली साडेचार हजार मते ही वाखण्याजोगी होती. मात्र या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपा स्वतंत्र पॅनल टाकून तिसरा पर्याय निर्माण करतील, अशी जनतेची भावना होती. मात्र, नेहमीप्रमाणेच भाजपाने भ्रमनिरास करून रासपाचे आमदार राहुल कुल यांच्याबरोबर युती केल्याने त्यांना मोठा फटका बसला.
या युतीत भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. परिणामी त्यांचे पुतणे केशव काळे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. मात्र, नियोजन मंडळाचे सदस्य नामदेव ताकवणे या निवडणुकीत कुठेही सहभागी नसल्याचे दिसून आले. परिणामी रासपाबरोबर युती झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते देखील नाराज होते. कारण राहुल कुल यांनी भाजपाला एकच जागा दिली. उर्वरित गटात आणि गणात स्वत:चे कार्यकर्ते भाजपाच्या तिकिटावर उभे केले. याचा रोष मात्र नामदेव ताकवणे समर्थकांत दिसून आला. तालुक्यातील भाजपा कधी कुलांकडे तर कधी थोरांताकडे सलगी करतो हे जनतेला कळून चुकले आहे. तेव्हा भाजपाला तालुक्यात स्वत:चे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर येथून पुढे शुन्यातून प्रगती केली तरच भविष्यात भाजपाला संधी आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया यांची युती रासपा-भाजपाबरोबर आहे,असे कुल गटाने जाहीर केले होते. तर दुसरीकडे आरपीआयची युती आमच्याबरोबर आहे,असे थोरात गट सांगत होता. पुणे जिल्हा आरपीआयचे युवक अध्यक्ष विकास कदम यांना मात्र राष्ट्रवादीने उमेदवारी दिली ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही.
भीमा-पाटस कारखाना या हंगामात बंद आहे. कामगारांचे पगार थकलेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र गेल्या १० वर्षांपासून राहुल कुल जाहीर भाषणातून सांगतात, की कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारत आहेत. परंतु ही परिस्थिती आजपावेतो सुधारली नाही. यामुळे या हंगामात कारखाना बंद ठेवावा लागला. तरीदेखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामात कारखाना सुरू करतो,असे आश्वासन कुलांनी दिले. मात्र कारखान्याच्या संदर्भात नेहमीच आश्वासने दिली जातात. हे मतदारांने हेरल्यामुळेच कुलांना चांगलीच चपराक दिली. गेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून कुल यांचा हक्काच्या राहू खामगाव गटातून मतांची संख्या घटत चालली आहे. ती या निवडणुकीत खूपच घटली. दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी मात्र रासपा आणि भाजपा युतीची चांगलीच दमछाक केल्याचे त्यांना मिळालेल्या मतांवरून स्पष्ट झाले. अन्यथा राहूबेटात आजपावेतो हजारोंच्या फरकाने कुलांचे उमेदवार विजयी झाल्याची परंपरा आहे. मात्र ही परंपरा नागवडे यांनी मोडीत काढली. तसेच विधानसभेला देखील राहूबेटातील मत गेल्या २४ वर्षांपासून निर्णायक ठरत आलेली आहेत.