अधिकारी अवैध दारूच्या अड्ड्यावर छापा मारायला गेले अन् मार खाऊन आले; माळेगावमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 02:43 PM2023-11-24T14:43:23+5:302023-11-24T14:43:46+5:30
शासकीय व खाजगी वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर ...
सांगवी (बारामती, पुणे) :बारामती तालुक्यातील माळेगाव येथे अवैध दारूच्या अड्डय़ावर छापा मारण्यासाठी गेलेल्या दौंड व बारामतीच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना लाकडी काठी व दगडाने मारहाण केली. तसेच शासकीय व खाजगी वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवार (दि. २३) रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास माळेगाव हद्दीत विक्रमनगर येथे आरोपी यांच्या राहते घरासमोर हा प्रकार घडला. तर मारहाणीत जखमी अधिकारी बारामतीत रुग्णालयात उपचार घेत आहेत.
रात्री अकरा वाजण्याच्या पुढे हे अधिकारी अवैध दारूच्या अड्डय़ावर छापा मारायला गेले होते. दरम्यान जमावाकडून अधिकाऱ्यांना काठी व दगडाने बेदम मारहाण झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन खळबळ उडाली आहे. तर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या धक्कादायक प्रकारामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
या मारहाणीत उत्पादन शुल्क विभागाचे शासकीय वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले आहे. फिर्यादी विजय वसंतराव रोकडे (वय ५५), यांनी आरोपी किशोर जनार्धन धनगर, पिंटु गव्हाणे व अनोळखी ८ ते १० इसम सर्व रा. विक्रमनगर माळेगाव, ता. बारामती, जि.पुणे. यांच्या विरोधात सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनीयमानुसार माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत सरकारी वाहन (क्र. एमएच १२टीके ९६९२), व खाजगी वाहन (क्र. एमएच १४ केएफ८०८०) या वाहनांचे नुकसान झाले आहे.
तसेच मारहाणीत फिर्यादीसह गणेश बाबुराव नागरगोजे (वय ३३), राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक दौंड, सुभाष लक्ष्मण मांजरे (वय ५६), राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक दौंड, प्रविण रामचंद्र सुर्यवंशी (वय ४३) राज्य उत्पादन जवान दौंण्ड, अशोक काशीनाथ पाटील (वय ५०), राज्य उत्पादन शुल्क जवान दौंड, सागर रामचंद्र सोनवले (वय ४०), रा .मळद ता बारामती जि पुणे. हे जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यातील फिर्यादी हे त्यांच्या स्टाफ व पंचासह शासकीय काम करीत असताना यातील आरोपी यांनी बेकायदा जमाव जमवून हातातील काठीने व दगडाने मारहान करुन शिवीगाळी केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करुन शासकीय व खाजगी वाहनांना दगड मारुन काचा फोडण्यात आल्या आहेत. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे हे अधिक तपास करीत आहेत.