पिरंगुटमधील महावीर ज्वेलर्सवर दरोडा; १८-१९ लाखांचा ऐवज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 03:17 PM2017-11-16T15:17:33+5:302017-11-16T15:21:11+5:30
हसमुख ओसवाल यांच्या महावीर ज्वेलर्स या दुकानात (दि. १५ नोव्हें.) रोजी रात्री चोरट्यांनी लोखंडी गजाने शटर उचकटून व लोखंडी जाळीच्या दरवाज्याची कुलुपे तोडून अत्यंत शिताफीने चोरी केली.
पौड : पिरंगुट (ता. मुळशी) येथे हसमुख ओसवाल यांच्या महावीर ज्वेलर्स या सोने चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. या दुकानात (दि. १५ नोव्हें.) रोजी रात्री चोरट्यांनी लोखंडी गजाने शटर उचकटून व लोखंडी जाळीच्या दरवाज्याची कुलुपे तोडून अत्यंत शिताफीने चोरी केली.
हे दुकान पिरंगुट बस स्थानक पारिसरात मुख्य रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी असूनही चोरांनी दुकानात चोरी कशी केली याचेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वीही दोन दुकान फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला होता. यावेळी मात्र चोरटे यशस्वी झाले. दुकानासमोर व दुकानात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेर्याचे वायर कट करून चोरट्यांनी कॅमेर्याची हार्ड डिस्क व डीव्हीआरही चोरून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच सकाळी लवकरच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. देहू रोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगूळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दुकानदाराने दिलेल्या माहिती नुसार दुकानातील अंदाजे ५५० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व १५ ते १६ किलो चांदीचा ऐवज चोरीला गेला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सदर दुकानाचे सेंटर लॉक तसेच इमर्जन्सी अलार्म मागील काही दिवसांपासून बंद होता. त्यामुळे चोरांनी याचा फायदा घेत व दुकानासमोर आपली मोटार आडवी लावून हा उद्योग केला असल्याने रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही याचा अंदाज आला नाही. शेजारी असलेला एक खासगी दवाखाना व फळविक्रेत्याचे दुकान रात्री बंद असल्याने कोणालाच सदर घटना घडत असताना चाहूल लागली नाही. चोरीच्या घटनांना आळा बसावा याकरिता येथील व्यापारी संघटनेने मागील महिन्यातच पिरंगुट परिसरातील दुकाना समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते, परंतु सदर कॅमेर्यांना हार्ड डिस्कच नसल्याने फुटेज उपलब्ध नसल्याने या चोरीची तपासात गुंतागुंत वाढणार आहे.
मागील पंधरा वर्षात हेच दुकान चोरांनी दोन वेळा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. यावेळी चोरांनी मागील काही दिवस दुकानाची व दुकान परिसराची रेकी करून पूर्ण तयारीने येऊन दुकान फोडून चोरी करण्यात यश मिळविले. पिरंगुट परिसरात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांनी व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.