ज्वेलरी दुकानावर तळेगावमध्ये दरोडा
By admin | Published: October 3, 2015 01:06 AM2015-10-03T01:06:19+5:302015-10-03T01:06:19+5:30
दहा ते बारा हत्यारबंद दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत वर्दळीच्या चौकातील तळेगाव स्टेशन येथील कमला ज्वेलर्सचे दुकान लुटले.
तळेगाव दाभाडे : दहा ते बारा हत्यारबंद दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत वर्दळीच्या चौकातील तळेगाव स्टेशन येथील कमला ज्वेलर्सचे दुकान लुटले.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. यामध्ये रोख रकमेसह लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लुटले. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दुकानाचे मालक मनोज मोहनलाल पालरेशा (वय ४२) व मंगेश मोहनलाल पालरेशा (वय ३९, दोघहीे रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरडाओरडा ऐकून हाकेच्या अंतरावर असलेल्या तळेगाव स्टेशन चौकातील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी वाहतूक पोलीस नाईक विजय मारणे व विशाल सांगळे यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले.
दरोडेखोरांनी बाजारपेठेतील दुकानांवर पिशवीतून आणलेल्या रेल्वे रुळातील खडींचा भडीमार केला. त्यांनी हवेत गोळीबार करून दहशत माजवली. त्यामुळे दुकानदारांनी पटापट शटर बंद केले. त्यानंतर काही दरोडेखोर कमला ज्वेलर्समध्ये घुसले. त्यातील काही जण दुकानाबाहेर थांबून, दगडफेक करून त्यांनी दहशत माजवली. दरोडेखोरांनी पालरेशा बंधूंना मारहाण केली. लाखो रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी तळेगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने पलायन केले. वाहतूक पोलीस व स्थानिक नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला असता दरोडेखोरांनी गोळीबार केला. पोलिसांना घटनास्थळी एक जिवंत काडतूस व पुंगळी सापडली. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या मालगाडीचा व अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार झाले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक विवेक पानसरे दाखल झाले.