बारामती तालुक्यात अवैध दारूधंद्यावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:20 AM2021-05-05T04:20:06+5:302021-05-05T04:20:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मोरगाव : बारामती तालुक्यातील चार गावांत मंगळवारी (दि. ४) राज्य उत्पादन शुल्क ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मोरगाव : बारामती तालुक्यातील चार गावांत मंगळवारी (दि. ४) राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने अवैध दारू धंद्यात धडक मोहीम राबवत ६० हजारांची दारू नष्ट केली. तसेच ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बारामती तालुक्यात सातत्याने वाढत असलेल्या अवैध ताडी धंदे, दारू निर्मिती केंद्रे, विक्री केंद्रे, आदी विरोधात धडक कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक- संतोष झगडे यांनी विशेष मोहीम राबवून उपअधीक्षक- संजय जाधव, दौड विभागाचे निरीक्षक- विजय मनाळे, भरारी पथक क्र.२ पुणे निरीक्षक अनिल बिराजदार, जी विभागाचे निरीक्षक बाळासाहेब ढवळे व बारामती पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या संयुक्त पथकाने आज धडक कारवाई केली.
तालुक्यातील माळेगाव, घाडगेवाडी, पिंपळी व झारगरवाडी येथे अवैध दारुधंद्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत झारगडवाडी येथील गणेश जाधव (वय ३५, रा. झारगडवाडी), मीनाक्षी काळे (वय २८, रा. झारगडवाडी) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी, विदेशी मद्य, गावठी दारू, रसायन असा ६० हजार ५८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे.