इंदापूर तालुक्यात हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे; २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 12:54 PM2022-12-09T12:54:40+5:302022-12-09T12:55:55+5:30
आठ जणांवर भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल..
इंदापूर (पुणे) : बावडा परिसरात आठ ठिकाणच्या अवैध हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून पोलीसांनी २ लाख २८ हजार रुपयांची तयार दारु व दारु बनवण्याचे साहित्य जप्त केले. आठ जणांवर भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना बावडा भागात बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारु काढण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बावड्यात जिथं हातभट्टीची दारु काढली जाते अशा आठ ठिकाणी छापे मारले. त्या ठिकाणांवरुन रसायनाने भरलेले तीनशे लिटरचे पाच बॅरल, दोनशे लिटरचे १२ बॅरल, शंभर लिटरचा एक बॅरल व इतर साहित्य असा २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आज (दि. ९) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के. बी. शिंदे, युवराज कदम, महिला हवालदार शुभांगी खंडागळे, हवालदार मनोज गायकवाड, पोलीस नाईक सलमान खान, अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, महिला पोलीस नाईक मुजावर, पोलीस शिपाई विकास राखुंडे, दिनेश चोरमले यांनी ही कारवाई केली.