पुण्याच्या बिबवेवाडीत दारू अड्ड्यावर छापा; तब्बल ९९८ लिटर दारू जप्त, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 09:11 AM2022-05-20T09:11:39+5:302022-05-20T09:11:50+5:30
सामाजिक सुरक्षा विभागाने बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून तब्बल ९९८ लीटर दारूसह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे
पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून तब्बल ९९८ लीटर दारूसह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सायंकाळी गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शारदा किसन सोनवणे (वय ६० वर्षे, रा. झांबरे वस्ती, बिबवेवाडी कोंढवा रोड, पुणे) अनिल यशवंत गुप्ते (वय २८ वर्षे, रा. झांबरे वस्ती, बिबवेवाडी कोंढवा रोड, पुणे) विजय सिद्धाप्पा कट्टीम्हणी (वय २४ वर्षे, रा.झांबरे वस्ती, बिबवेवाडी कोंढवा रोड, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार सायंकाळी गुप्त खबऱ्यामार्फत बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत सर्व्हे नंबर १६९/ १६, अण्णाभाऊ साठे नगर, अप्पर कोंढवा रोड , झांबरे वस्ती, बिबवेवाडी येथे विक्रीसाठी, गावठी दारुचा साठा करुन ठेवल्याचे समजले. त्यानुसार पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. या कारवाईत तिघांना अटक केली असून ३९,८५०/- किंमतीची ९९८.५ लीटर गावठी हातभट्टीची दारू व रु. ८३०/- रोख रक्कम असा एकूण ४०,८६०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.