Diwali 2022| ...त्यांनी लावलेल्या पणत्यांनी स्वराज्याची राजधानी लखलखली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 05:46 PM2022-11-01T17:46:33+5:302022-11-01T17:55:37+5:30
बारामतीकरांनी कुटुंबांना कपडे, फराळ वाटप करून केली दिवाळी साजरी...
बारामती : स्वराज्याची राजधानी रायगड आणि तिथे वास्तव्य करणाऱ्या रायगडवासीयांबरोबर बारामतीकर युवकांनी दिवाळी साजरी केली. थेट रायगडावर जात तेथील कुटंबीयांना कपडे दिवाळी फराळ वाटप करण्याचा अनोखा उपक्रम या युवकांनी राबविला. युवकांनी लावलेल्या पणत्यांनी रायगड उजळून निघाला.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, सुधीर पानसरे, ॲड. सचिन वाघ, ॲड. रोहित काटे, योगेश पाटील यांच्यासह अन्य युवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रायगडावर जात तेथील कुटुंबीयांबरोबर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या ठिकाणी जात दिवाळी साजरी केली. या युवकांनी लावलेल्या पणत्यांनी रायगड उजळून निघाला. शरयू फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार यांनी त्यासाठी दिलेल्या दिवाळी फराळाचे येथील कुटुंबीयांना वाटप करण्यात आले. या युवकांनी जपलेले सामाजिक भान आणि ऐन दिवाळीत राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमोल काटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, पूर्वी आम्ही रायगडावर राहणाऱ्या कुटुंबीयांच्या शालेय विद्यार्थ्यांना मदत करीत असून तेथील कुटुंबे अल्पभूधारक आहेत. त्यांचा मुख्य रोजगार गडावर येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. लॉकडाऊनमध्ये पर्यटक येणे बंद झाले होते, तसेच चक्रीवादळात त्यांची २५ घरे उडून गेली. त्यामुळे पत्रा आदी सहित्यासह दोन ट्रक भरून आम्ही त्यांना मदत केली. त्यानंतर त्यांनी दिवाळी साजरी करण्यास गडावर येण्याचे आमंत्रण दिले. त्यामुळे आम्ही रिकाम्या हाताने जाण्यापेक्षा कपडे, फराळ, साखर आदी सहित्य घेऊन गेलो. आमचे रायगडाबरोबर एक अतूट नाते तयार झाले आहे.
शिवछत्रपतींच्या नंतर ऐश्वर्यसंपन्न असणाऱ्या या रायगडावर अनेक हल्ले झाले. यात किल्ल्याबरोबर आसपासची गावेदेखील उद्ध्वस्त होत होती. एका हल्ल्यातून सावरतोय न् सावरतोय तोच दुसरा हल्ला, असा सततचा संघर्ष या रायगडवासीयांच्या नशिबी आला. तरीदेखील हे लोक तिथेच राहिले. म्हणूनच ज्या ज्या वेळेस अडचण असेल त्या त्या वेळी आपण आपल्या परीने मदत करण्याचे ठरविले. सामाजिक कामात आमच्या पाठीशी असणाऱ्या ‘शर्मिलावहिनीं’नी फराळाची पॅकेट्स पाठवून दिली. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व रायगडवासीयांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्यासाठी दिवाळी होती. प्रेरणास्रोत असणाऱ्या रायगडावरील ही दिवाळी आमच्या कायम स्मरणात राहील, असे काटे यांनी सांगितले.