रिक्षा पंचायतीतर्फे आज निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:52 AM2017-07-31T04:52:25+5:302017-07-31T04:52:25+5:30
रिक्षा सेवेला देशोधडीला लावणारे अनेक निर्णय मागील काही दिवसांमध्ये घेतले गेले आहेत. त्यामध्ये बदल करून यावर अवलंबून असणा-या लाखो जणांचे आयुष्य उजाड होण्यापासून वाचवावे
पुणे : रिक्षा सेवेला देशोधडीला लावणारे अनेक निर्णय मागील काही दिवसांमध्ये घेतले गेले आहेत. त्यामध्ये बदल करून यावर अवलंबून असणा-या लाखो जणांचे आयुष्य उजाड होण्यापासून वाचवावे, या मागणीसाठी रिक्षा पंचायतीच्यावतीने सोमवार, दि. ३१ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निर्दशने करणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
आरटीओ कार्यालयामध्ये रिक्षा परवाना अर्ज आॅनलाईन भरण्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर ही निर्दशने करण्यात येणार आहेत. नवीन रिक्षा परवाने अनियंत्रित पद्धतीने देऊ नयेत, ओला उबेर सारख्या नियमबाह्य वाहनांवर बंदी घालावी, केंद्र व राज्य शासनाने नुकतीच केलेली प्रचंड दंडवाढ मागे घ्यावी, विमा हप्ता जोखिमे एवढाच व्हावा, यासाठी परिणामकारक प्रयत्न पाठपुरावा करावा, परवाने देताना सर्वांत जुन्या बॅज धारकला, सर्वांत आधी व वय वर्षे ५० च्या आत मरण पावलेल्या परवाना नसलेल्या रिक्षा चालकाच्या पत्नीला त्यानंतर या क्रमाने परवाना वाटप करावे, आधीचा परवाना विकलेल्यास नवा परवाना देऊ नये, आदी मागण्यांसाठी ही निर्दशने करण्यात येणार आहेत.