‘रेल नीर’ने भागतेय स्वस्तात तहान, वर्षभरात पुणे विभागात १६ लाख लिटर पाण्याची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 02:39 AM2018-08-13T02:39:27+5:302018-08-13T02:39:43+5:30
रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून ‘रेल नीर’ला पसंती मिळत आहे. पुणे विभागातील विविध स्थानकांवर बसविण्यात आलेल्या पाणीविक्री मशीन (डब्ल्युव्हीएम) मधून मागील वर्षभरात तब्बल १६ लाख लिटर पाण्याची विक्री झाली आहे.
पुणे - रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून ‘रेल नीर’ला पसंती मिळत आहे. पुणे विभागातील विविध स्थानकांवर बसविण्यात आलेल्या पाणीविक्री मशीन (डब्ल्युव्हीएम) मधून मागील वर्षभरात तब्बल १६ लाख लिटर पाण्याची विक्री झाली आहे. बाटलीबंद पाणी घेणे न परवडणाºया प्रवाशांची तहान स्वस्तातील रेल नीर भागवत असल्याने प्रतिसाद वाढत आहे.
प्रवाशांना शुद्ध आणि कमी दराने पाणी मिळावे, यासाठी इंडियन केटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) एप्रिल २०१७ पासून रेल्वेस्थानकांवर पाण्याच्या मशीन बसविण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेले बाटलीबंद पाणी विकत घेणे अनेक प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळे हे प्रवासी स्थानकांवर उपलब्ध असलेल्या पाणपोईवरून पाणी घेतात; पण अनेकदा याठिकाणी स्वच्छता नसल्याने प्रवासी तिथेही जाणे टाळतात. तसेच पाण्याच्या स्वच्छतेबाबतही तक्रारी असतात. त्यामुळे काही जण नाइलाजास्तव न परवडणारे बाटलीबंद पाणी विकत घेतात. त्यामुळे रेल्वेने मागील वर्षीपासून स्थानकांवर पाण्याच्या मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. बाटलीबंद पाण्यापेक्षा अत्यंत कमी दरात हे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. पुणे विभागामध्ये काही प्रमुख रेल्वेस्थानकांवर एकूण १४ मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९ मशीन पुणे स्थानकावर आहेत. फलाट क्रमांक एकवर तीन, फलाट क्रमांक २, ३, ४, ५ व ६ वर प्रत्येकी दोन मशीन आहेत. तसेच मिरज स्थानकावर तीन, कोल्हापूर व सांगली स्थानकावर प्रत्येकी एक मशीन बसविण्यात आली आहे. या सर्व मशीनला पाणी शुद्ध करणारी यंत्रणाही बसविण्यात आली आहे. मशीनमधून प्रवाशांना चोवीस तास पाणी उपलब्ध होते. याठिकाणी पाणी देण्यासाठी कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. स्वयंचलित पद्धतीनेही पाणी उपलब्ध होते. रेल्वेच्या दरपत्रकानुसार, अर्धा लिटर पाण्यासाठी केवळ तीन रुपये, तर एक लिटर पाण्यासाठी केवळ पाच रुपये मोजावे लागतात. तसेच, २ लिटर पाण्यासाठी आठ रुपये आणि पाच लिटर पाणी केवळ २० रुपयांत मिळत असल्याने हे पाणी घेण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत आहे.
८० लाख रुपयांचे : उत्पन्न मिळाले
पुणे विभागात एप्रिल २०१७ पासून या मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तेव्हापासून जुलै अखेरपर्यंत या मशीनमधून तब्बल १६ लाख लिटर पाण्याची विक्री करण्यात आली आहे. यातून विभागाला ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या मशीनमधील प्रत्येक तासाला सुमारे १०० लिटर पाणी मिळू शकते. गर्दीच्या वेळी या मशीनसमोर रांगाही लागतात. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.