नीरा स्टेशनवर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी, मंगळवारी 'रेल रोको' आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:28 PM2023-06-05T12:28:50+5:302023-06-05T12:30:01+5:30
आंदोलनात प्रवाशांसह, ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे...
नीरा (पुणे : पुणे - मिरज लोहमार्गावरील नीरा रेल्वे स्टेशनवर सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा, नीरा रेल्वे स्टेशनच्या २ नंबरच्या प्लॅटफॉर्मचे काम त्वरित पूर्ण करावे, तसेच नीरा रेल्वे स्थानकातून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या पूर्वीप्रमाणे जुन्याच प्लॅटफॉर्मला थांबवाव्यात, अशा मागण्यांसाठी नीरा व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता रेलरोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात प्रवाशांसह, ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीन- वास्को ही गोवा एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, यशवंतपूर बंगलोर संपर्क क्रांती एक्स्प्रेस, चंदिगढ - यशवंतपूर ही चंदिगढ एक्स्प्रेस, बंगलोर-अजमेर एक्स्प्रेस, कोल्हापूर-अहमदाबाद या लांब पल्ल्याच्या गाड्या ये - जा करीत असतात. मात्र या गाड्यांना पुणे रेल्वे स्थानकानंतर थेट सातारा येथील रेल्वे स्थानकांवरच थांबा आहे.
रेल्वे प्रशासनाने ६ जूनपासून पुणे - मिरज ही साप्ताहिक विशेष सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू करीत आहे. या एक्स्प्रेसला जेजुरीनंतर लोणंद रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलेला आहे. परंतु या साप्ताहिक एक्स्प्रेसला नीरा रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे नीरा रेल्वे स्थानकात पल्ल्याच्या सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात यावा. नीरा रेल्वे स्टेशनच्या २ नंबरच्या प्लॅटफॉर्मचे काम त्वरित पूर्ण करावे. तसेच जोपर्यंत २ नंबरचा प्लॅटफॉर्मचे काम होत नाही तोपर्यंत पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या जुन्या १ नंबरच्या प्लॉटफॉर्मला थांबवाव्यात. अशा विविध मागण्यांसाठी नीरा व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या पुणे - मिरज या साप्ताहिक विशेष सुपरफास्ट रेल्वेगाडीसमोर नीरा रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन ग्रा. पं. सदस्य वा नीरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद काकडे, बाळासाहेब साळुंखे, अमीर मणेर, सामाजिक कार्यकर्ते टी. के. जगताप, सुधीर शहा, सचिन मोरे, संतोष मोहिते आदींनी नीरा रेल्वे स्टेशन मास्टर मिनाकूमार यांना दिले.