रेल्वेची ‘वेळ’ खराब, शेकडो गाड्यांना विलंब, रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:39 AM2018-05-16T01:39:03+5:302018-05-16T01:39:03+5:30

दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणारी रेल्वे प्रवाशांना वेळेत सेवा देण्यात अपयशी ठरत आहे. मंगळवारी देशभरातील तब्बल ६७ टक्के रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या, तर १४१ गाड्या रद्द करण्यात आल्या आणि १२५ गाड्यांच्या वेळेत विविध कारणांमुळे बदल करावा लागला.

Rail time 'bad', delay in hundreds of trains, canceled | रेल्वेची ‘वेळ’ खराब, शेकडो गाड्यांना विलंब, रद्द

रेल्वेची ‘वेळ’ खराब, शेकडो गाड्यांना विलंब, रद्द

Next

- राजानंद मोरे
पुणे : दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणारी रेल्वे प्रवाशांना वेळेत सेवा देण्यात अपयशी ठरत आहे. मंगळवारी देशभरातील तब्बल ६७ टक्के रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या, तर १४१ गाड्या रद्द करण्यात आल्या आणि १२५ गाड्यांच्या वेळेत विविध कारणांमुळे बदल करावा लागला. त्यामध्ये लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस, विशेष अशा सर्वच गाड्यांचा समावेश असून यामध्ये पुणे विभागही अपवाद नाही.
रेल्वेला दररोज लाखो प्रवाशांना सेवा देताना नाकीनऊ येऊ लागले आहे. देशभरात सुमारे १३ हजारांहून अधिक रेल्वेगाड्यांमार्फत प्रवासी वाहतूक केली जाते. त्यापैकी दररोज निम्म्याहून अधिक गाड्या कमी-अधिक वेळेच्या फरकाने विलंबाने धावतात. काही गाड्यांवर तर ‘लेट’चा शिक्काच पडलेला आहे. रेल्वेच्या वेळा सुधारण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यात रेल्वेला फारसे यश येताना दिसत नाही. ब्लॉक, अपघात, लोहमार्गाला तडे, लोहमार्ग उखडणे, सिग्नल यंत्रणेतील बिघाड, रेल्वेशी संबंधित कामे, नैसर्गिक आपत्ती अशा विविध कारणांमुळे रेल्वेगाड्या पूर्णपणे किंवा अंशत: रद्द केल्या जातात. तर अनेक गाड्या विलंबाने धावतात. त्यापैकी लोकल, पॅसेंजर गाड्यांना याचा अधिक फटका बसतो. तसेच विशेष किंवा साप्ताहिक गाड्यांनाही या प्रकाराला अनेकदा सामोरे जावे लागते.
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि रेलयात्री या संस्थांच्या ‘रेलरडार’ या संकेतस्थळानुसार मंगळवारी (दि. १५) दुपारी ३.३३ वाजता देशभरात विविध रेल्वेमार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी तब्बल ६७ टक्के गाड्या विलंबाने धावत होत्या. केवळ ३३ टक्के गाड्या वेळेत होत्या. ही स्थिती जवळपास दररोज पाहायला मिळते. तर रेल्वेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मंगळवारी देशातील १४१ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, ७६ गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हे प्रमाणही अनेकदा दोनशे गाड्यांच्या जवळपास जाते.
>मंडूवाडीह ते पुणे : तब्बल २६ तास २१ मिनिटे विलंब
वाराणसी येथील मंडूवाडीह ते पुणे ही शनिवारी सुटणारी सुट्टी विशेष गाडी दरवेळी किमान २० ते २५ तास उशिराने धावते. ही गाडी दि. १२ मे रोजी सकाळी ४.४५ वाजता मंडूवाडीह या स्थानकातून निघणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात तब्बल २२ तास उशिराने पहाटे २.५० वाजता प्रस्थान केले. त्यानंतर विलंब होत जाऊन प्रत्यक्षात पुणे स्थानकात ही गाडी तिसºया दिवशी म्हणजे दि. १४ मे रोजी सकाळी ११.३६ वाजता पोहोचली. तब्बल २६ तास २१ मिनिटांनी उशिरा आली.पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाºया काही गाड्यांचा विचार केल्यास मागील काही दिवसांत गाड्यांना होणाºया सरासरी विलंबानुसार पुणे ते काझीपेठ ही गाडी १५ तास विलंबाने धावली. तर पुणे ते हातिया ही गाडी साडेपाच तास, पुणे ते बिलासपूर ही गाडी १ तास १३ मिनिटे विलंबाने धावत असल्याचे दिसते. पुण्यासह देशभरातील अन्य स्थानकांहून सुटणाºया गाड्याही सातत्याने विलंबाने धावत असल्याचे चित्र आहे.
आम्ही मागील आठवड्यात मंडूवाडीह वाराणसी ते पुणे विशेष गाडीने प्रवास केला. अलाहाबाद ते पुणे हा रेल्वेप्रवास सुमारे २४ तासांचाच आहे. पण गाडी यायलाच तेवढा उशीर झाला. शेकडो प्रवासी कुटुंबासह गाडीची वाट पाहत या कडक उन्हाळ्यात ताटकळत उभे होते. त्यात लहान मुले, स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल झाले. गाडी उशिरा आली तरी पुढचा प्रवास तरी ती वेळेत पूर्ण करेल ही किमान अपेक्षा पूर्ण होत नाही. गाडी मधल्या अनेक लहान स्थानकांवर थांबवून ठेवण्यात येते. नियमित गाड्यांना पुढे सोडण्यात येते. उन्हाळी विशेष गाड्यांवर रेल्वेने असा अन्याय करणे योग्य नाही. त्यातही प्रवास करणारे माणसेच आहेत.
- इंद्रसेन सिंह, प्रवासी
पुण्यातून सुटणाºया
गाड्यांना होणारा विलंब

रेल्वेगाडी सरासरी विलंब
१. पुणे-काझीपेठ १५ तास
२. पुणे-बिलासपूर १ तास १३ मि.
३. पुणे-दानापूर १ तास १० मि.
४. पुणे-मनमाड ४५ मि.
५. पुणे-हातिया ५ तास ३० मि.
६. पुणे-हावडा १ तास
७. पुणे-जबलपूर २ तास ५१ मि.
८. पुणे-नांदेड ४७ मि.
पूर्ण व अंशत: रद्द गाड्या
दिवस रद्द गाड्या अंशत: रद्द
दि. १२ मे १७५ ६२
दि. १३ मे १८९ ५८
दि. १४ मे १७३ ४८
दि. १५ मे १४१ ७६
(दुपारी ३ ची स्थिती)
दि. १६ मे ९७ ३२
(दुपारी ३ ची स्थिती)
रेल्वेगाड्यांच्या वेळांबाबत प्रवाशांची सातत्याने नाराजी असते. काही गाड्या अचानक रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. रेल्वेगाड्या, स्थानकांवर पुरेशा सुविधा नसल्याने कुचंबणा होते. काही गाड्या २० ते २५ तास विलंबाने धावतात. याचा अनुभव अनेकदा घेतला आहे. या वेळी प्रवाशांचे होणारे हाल बघवत नाहीत.
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
१५ मे रोजी
पुण्यातून रद्द गाड्या
१. पुणे निझामाबाद पॅसेंजर
२. पुणे-दौंड (स. १०.३२)
३. पुणे-लोणावळा (दु. १२.१५)
४. पुणे-लोणावळा (दु. १)
५. पुणे-लोणावळा (दु. ३)
प्रवासी हतबल
काही तास वेळ वाया
स्थानकांवर सुविधा नसल्याने हाल
खानपानाचा प्रश्न
विश्रामगृहांची अपुरी सुविधा
प्रवासादरम्यान मनस्ताप
अनेक कामांचा खोळंबा
देशातील रेल्वे गाड्यांची स्थिती (दुपारी ३.३३ वा.)
विलंबाने धावणाºया गाड्या
- ६७ टक्के
वेळेत धावणाºया गाड्या
- ३३ टक्के

Web Title: Rail time 'bad', delay in hundreds of trains, canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.