मद्यधुंद प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचा दणका; तब्बल ४ लाखांचा दंड वसूल
By अजित घस्ते | Published: December 18, 2023 06:11 PM2023-12-18T18:11:41+5:302023-12-18T18:12:50+5:30
कोणत्याही सरकारी जागेत मद्यपान करणे, गोंधळ घालणे अशा प्रकाराला बंदी; परंतु, याकडे दुर्लक्ष करून नियम मोडणार्यांची संख्या मोठी
पुणे: रेल्वे स्थानक आणि परिसरात मद्यधुंद अवस्थेत फिरणे, असभ्य भाषा करणे, कारण नसताना वादविवाद करणे, रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४५ अंतर्गत मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थअंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान एकूण ११५० गुन्हे नोंदवले असून, अशा प्रकारे गुन्हे करणार्यांकडून ४ लाख ९६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोणत्याही सरकारी जागेत मद्यपान करणे, गोंधळ घालणे अशा प्रकाराला बंदी आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष करून नियम मोडणार्यांची संख्या मोठी आहे. अशा व्यक्तींवर रेल्वे सुरक्षा बलाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने कलम १४५ ए, बी आणि सी अंतर्गत ६३९ गुन्ह्यांची नोंद केली असून, त्यातून ३ लाख ९३ हजार ८३० रुपये इतका दंड वसूल केला आहे. याव्यतिरिक्त सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा - २००३ अंतर्गत ५११ गुन्हे नोंदविण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख २ हजार २०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली आहे.