पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील दत्त मंदीर पाडले; अनेक वर्षांचे पिंपळाचे झाडही काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:25 AM2019-09-17T11:25:08+5:302019-09-17T11:30:19+5:30
साधारणपणे ३० ते ४० वर्षांपुर्वी याठिकाणी मंदिराची उभारणी करण्यात आली.
पुणे : मागील काही वर्षांपासून पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेले सुर्यमुखी दत्त मंदीर रेल्वे प्रशासनाकडून दोन दिवसांपुर्वी पाडण्यात आले. या मंदिरातील दत्त मुर्ती रिक्षा स्टॅन्डलगतच्या सबवेच्या भिंतीजवळ ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंदिराजवळ असलेले अनेक वर्षांचे पिंपळाचे झाडही काढण्यात आले. स्थानक परिसराच्या पुनर्विकासामध्ये अडथळा निर्माण होत असल्याने हे मंदीर, झाड हटविण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानक आवारामध्ये अनेक वर्षांपुवीर्ची चार पिंपळाची मोठी झाडे होती. आरक्षण केंद्रासमोर एका झाडाखाली अनेक वर्षांपासून सुर्यमुखी दत्त मंदीर होते. साधारणपणे ३० ते ४० वर्षांपुर्वी याठिकाणी मंदिराची उभारणी करण्यात आली. रेल्वेतील काह कर्मचारी, रिक्षाचालकांसह अन्य काही जण या मंदीराची देखभाल करत होते. कालांतराने रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी वाढत गेली. त्यामुळे रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास सुरू करण्यात आला. त्यासाठी काही महिन्यांपुर्वी तीन झाडे तोडण्यात आली होती. तर दोन दिवसांपुर्वी चौथे झाड आणि त्याखालील मंदीर हटविण्यात आले. या मंदिरातील मुर्ती रिक्षा स्टॅन्डजवळ ठेवण्यात आली आहे. मंदीर काढण्यासाठी त्याची देखभाल करणाऱ्या लोकांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी होकार दिल्यानंतर मंदीर हटविण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळाचे झाड खुप मोठे असल्याने त्याचे खोड व मुळ्यांमुळे परिसरातील फरशी उखडली होती. त्याचा प्रवाशांनाही त्रास होता. त्यामुळे हे झाड काढणे आवश्यक होते. तर झाडाखालील मंदीर हटविल्याशिवाय झाड काढणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे आधी मंदीर हटवून झाड काढण्यात आले. त्यापुर्वी मंदीरातील दत्त मुर्ती रिक्षा स्टॅन्डजवळच्या भिंतीलगत ठेवण्यात आली आहे. तर झाडाचे मालधक्का येथील रेल्वेच्या जागेमध्ये पुनर्रोपण करण्यात आले. यापुर्वी काढण्यात आलेली झाडेही मालधक्का परिसरात पुनर्रोपित करण्यात आलेली आहेत. मंदीर पाडण्यापुर्वी संबंधितांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला कोणीही विरोध केला नाही.
------------
मागील सहा महिन्यांपासून ही झाडे काढण्याचा प्रयत्न सुरू होता. या कालावधीत अन्यत्र मंदीर उभारून झाले असते. आताचे मंदीर पाडण्यापुर्वी तेथील मुर्ती नवीन मंदिरात विधिवत ठेवता आली असती. पण रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता केवळ मुर्ती ठेवण्यात आली आहे.
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
........
रेल्वे स्थानकाच्या परिसराचा पुनर्विकास केला जात आहे. मंदीर व झाड असलेल्या परिसरात प्रवाशांसाठी मोठी शेड उभारली जाणार आहे. येथील झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग.