औरंगाबाद घटनेनंतर रेल्वे सतर्क ; रेल्वेमार्गांवर वाढविली गस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 06:06 PM2020-05-10T18:06:43+5:302020-05-10T18:09:06+5:30
औरंगाबाद येथे मजूरांना मालगाडीने चिरडल्याने आता पुणे रेल्वे विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. रेल्वे मार्गावर गस्त वाढविण्यात येत आहे.
पुणे : औरंगाबाद येथील घटनेनंतर पुणे विभागातील सर्व रेल्वे मार्गांवर लोकांनी येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर गस्त वाढविण्यात आली आहे. लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दलासह सर्व विभागांना सतर्क राहण्याबाबत सुचना दिल्या आहेत. तसेच चालकांनाही अत्यंत काळजीपुर्वक गाडी चालविण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणु शर्मा यांनी ‘लोकमत’ला दिली.
औरंगाबाद येथे शुक्रवारी पहाटे मालगाडीने १६ मजूरांना चिरडल्यानंतर रेल्वे यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळी उरळी ते लोणी स्थानकादरम्यान मालगाडी चालकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. सुमारे १५ ते २० जण रेल्वेमार्गावरच ठाण मांडून बसले होते. पण चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने त्यांचे प्राण वाचले. यापार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनाने सर्वच मार्गांवर गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागातील पुणे ते लोणावळा, पुणे ते दौंड आणि पुणे ते मिरज या मार्गांवर गस्त वाढविली आहे.
याविषयी बोलताना रेणु शर्मा म्हणाल्या, मागील दोन दिवसांपासून सर्व मार्गांवरील गस्त वाढविण्यात आली आहे. आरपीएफ, अभियांत्रिकी, संचलन यांसह विविध विभागांना याबाबत सुचना दिल्या आहेत. लोहमार्ग पोलिसांकडूनही गस्त घालण्यात येत आहे. प्रामुख्याने चालकांना सतर्क राहून गाडी चालविण्यास सांगण्यात आले आहे. सध्या मालगाडी आणि विशेष प्रवासी गाड्या सुरू आहेत. त्यामुळे मार्गावरून कोणीही चालताना दिसले तर त्यांना तातडीने दुर केले जाईल. त्यांना जीव धोक्यात न घालण्याबाबत सांगून तिथून हटविले जात आहे. रस्त्यानेच पायी जाण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.
रस्त्यानेच प्रवास करा
लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतुक पुर्णपणे बंद असल्याचे लोकांना वाटत आहे. पण पहिल्या दिवसापासून केवळ प्रवासी वाहतुक बंद आहे. मालगाड्या नियमितपणे धावत आहेत. तसेच काही दिवसांपासून श्रमिक स्पेशल गाड्याही सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्या ट्रॅकवरून कोणती गाडी कधी येईल, हे सांगता येत नाही. पण परराज्यात जाणारे अनेक मजुर रेल्वे ट्रॅकवरूनच पायी जात आहेत. तसेच विश्रांतीसाठीही ट्रॅकचाच आधार घेत आहेत. याच कारणामुळे शुक्रवारची घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वेने लोकांना रेल्वे ट्रॅकवरून किंवा जवळून न चालून जीव धोक्यात न घालता रस्त्यानेच चालावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.