Indian Railway: सणासुदीमुळे रेल्वे बुकिंग फुल्ल; विमानांची उड्डाणेही वाढली
By नितीश गोवंडे | Published: October 3, 2022 02:55 PM2022-10-03T14:55:01+5:302022-10-03T14:59:09+5:30
विमानाचा प्रवास आजही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांचे प्रथम प्राधान्य रेल्वेलाच असते....
पुणे : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे लोकांनी सुट्यांचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ९८ टक्के रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे आता गावी कसे जायचे? हा प्रश्न लोकांना पडला आहे. याऊलट कोरोनानंतर रविवारी पहिल्यांदाच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १७२ प्रवासी विमानांची ये-जा झाली, त्याद्वारे २५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आणखीन वाढणार असून विमानाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विमानाचा प्रवास आजही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांचे प्रथम प्राधान्य रेल्वेलाच असते. पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या रेल्वेंपैकी ९८ टक्के रेल्वे फुल्ल झाल्याने परराज्यात जाण्याऱ्या प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अजून पर्यंत रेल्वे बोर्डाकडून दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाल्यामुळे राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त शहर आणि परिसरात आले आहेत. तसेच पुणे हे विद्येचे माहेर घर म्हणून देखील ओळखले जाते, त्यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. दिवाळीत विद्यार्थ्यांना १५ ते २० दिवस सुट्टी असते त्यामुळे बहुतांश पालक दिवाळी निमित्त गावी जातात किंवा फिरायला जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे पुण्यातून सुटीच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.
मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव, छटपुजा आणि उन्हाळी सुट्टी विशेष रेल्वेन चालवल्या जातात. याच प्रकारे दिवाळी विशेष रेल्वे कधी सुरू करणार हा प्रश्न विचारला जात आहे. पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या विमानांच्या संख्येत देखील वाढ करण्यात आली असून, दिवसाला १५ ते १७ हजार प्रवासी विमानाने ये-जा करतात पण नुकताच २५ हजारांचा टप्पा गाठल्याने इतर ठिकाणच्या विमानांच्या संख्येत देखील वाढ होणे गरजेचे आहे.