रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:12 AM2021-03-17T04:12:06+5:302021-03-17T04:12:06+5:30
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी होणार आहे. तर ...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी होणार आहे. तर रेल्वेची परीक्षा सुद्धा २१ मार्चलाच होणार आहे. यामुळे दोन्ही परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना यापैकी कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. सरकारने कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता केवळ दबावा पोटी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसानच केले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
रेल्वेची परीक्षा ३२ हजार २०८ जागांसाठीची परीक्षा याआधीच जाहीर झाली आहे. ही परीक्षा ऑनलाईन होणार असून चार टप्यात होणार आहे. या परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारीत पार पडला. तर दुसऱ्या टप्यातील परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. एमपीएससीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करतात. एमपीएससी सोबत इतर स्पर्धा परीक्षेची तयारी देखील विद्यार्थी करतात. तसेच या परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही परीक्षा सोबत आल्याने एक संधी वाया जाणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत अवघ्या तीन दिवसांवर येथून ठेपलेल्या १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससी ने जाहीर केला होता. यावर राज्यभरात विद्यार्थ्यांचा उद्रेक उफाळून आला. याची दाखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागली होती. दुसऱ्या दिवशीच तारीख जाहीर केली जाईल असे, सांगण्यात आले. त्यानुसार २१ मार्चला परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. मात्र याचा फटका एमपीएससीसह रेल्वेची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बसणार आहे. यावर विद्यार्थ्यांनी नाराजी दर्शविली आहे.
आकडेवारी तक्ता
* २१ मार्च रोजी दोन्ही परीक्षा होणार
* राज्यात २ लाख ६० हजार
एमपीएससीसाठी विद्यार्थी
* ३७ जिल्हयात केंद्रावर होणार परीक्षा
------------------
दोन्ही परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी म्हणतात
रेल्वेने या आधीच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दोन्ही परीक्षा देणे म्हणजे चूक आहे का.
प्रत्येक वेळी काहींना काही गोंधळ घटला जातो. यात नुकसान केवळ विद्यार्थ्यांनी सहन करावे का.
-प्रतीक म्हस्के, परीक्षार्थी
--------------
स्पर्धा परीक्षा वेळेतच होतील याचा आता भरोसा राहिलेला नाही. दोन वेगळ्या विभागाच्या जागा येतात. हि आम्हां विद्यार्थ्यांना मिळालेली संधी आहे. केवळ कोणतेही नियोजन नकरता सरकारने घेतला निर्णय आहे. आयत चूक रेल्वेची नाहीच. सर्व वेळापत्रक ठरलेले असताना केवळ स्वतःचा शब्द पाळण्यासाठी घेतलेला दुर्दैवी निर्णय आहे.
- गिरीराज गिरी, परीक्षार्थी.
------------
राजकीय गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नेहमीच नुकसान होते. तारीख जाहीर करून मोकळे झाले. मात्र याचे काय परिणाम होणार याची दाखल देखील सरकारला घ्यावीशी वाटली नाही. कोरोना काळातही अभ्यास सुरु ठेवला आहे. एक संधी वाया जात आहे. केंद्रीय स्थरावर घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक पाळले जाते. याचा आदर्श राज्याने घेतला तर बरेच प्रश्न सोपे होतील.
- रोहित पाटील, परीक्षार्थी.
---------------
केंद्रावर पोहचणे अशक्यच
राज्य सेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर होणार आहेत. त्यामुळे ही दोन सत्रात पार पडणार आहे. जवळपस संपूर्ण दिवसच परीक्षेसाठी खरहची होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये रेल्वेची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहचणे अशक्यच आहे.