Pune : नीरा-जेऊरदरम्यानचे रेल्वे गेट ३६ तास राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 08:25 PM2022-12-12T20:25:01+5:302022-12-12T20:27:24+5:30
रेल्वे प्रशासनाची मांडकी व जेऊर ग्रामपंचायतीला माहिती
नीरा (पुणे) : नीरा-जेऊर मार्गावरील पिंपरे (खुर्द) हद्दीत असणारे जेऊर फाटा येथील रेल्वे गेट मंगळवार व बुधवारी दिवसभर वाहतुकीसाठी ३६ तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. यादरम्यान लोकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा-जेऊर, मांडकी या मार्गावर मिरज-पुणे रेल्वे लाईनवरील जेऊर फाटा येथील रेल्वेचे नंबर २८ किलोमीटर ८० / ४-५ गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी मंगळवार, दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ०७ ते बुधवार, दि. १४ रोजी सायंकाळी ०७ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मांडकी व जेऊर ग्रामपंचायतीला दिली आहे.
या दरम्यान जेऊर, मांडकीच्या नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
सध्या पुरंदरच्या वीर, मांडकी, जेऊर या ऊस बागायत पट्ट्यातून सोमेश्वर कारखान्याकडे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आधीच यावर्षी ऊसतोडणी कामगार कमी आलेत. गळीत हंगाम संथ गतीने सुरू आहे. तोडी लांबल्या आहेत. आता सलग ३६ तास वाहतूक बंद राहिल्याने स्थानिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.