Pune: पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट ३६ तास राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:52 PM2024-03-12T12:52:56+5:302024-03-12T12:53:14+5:30
नीरा ( पुणे ) : पुणे -पंढरपूर पालखी महामार्गावरील, पुणे-मिरज लोहमार्गावरील वाल्हे-नीरा दरम्यानचे थोपटेवाडी (ता. पुरंदर) हद्दीतील रेल्वे गेट ...
नीरा (पुणे) :पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील, पुणे-मिरज लोहमार्गावरील वाल्हे-नीरा दरम्यानचे थोपटेवाडी (ता. पुरंदर) हद्दीतील रेल्वे गेट बुधवार-गुरुवारी ३६ तास बंद राहणार असल्याचे रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/०१ रेल्वे फाटक बुधवार (दि.१३) सकाळी ७ ते गुरुवार (दि.१४) सायंकाळी ७ पर्यंत ३६ तास वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी, पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील पुणे-पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे रुळाची दुरुस्ती व निरीक्षणासाठी रेल्वे फाटक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती, रेल्वेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या रेल्वे गेटच्या जागी पालखी मार्गावर उड्डाणपूल असावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा काळात हे ठिकाण धोकेदायक आहे. रेल्वेचे दुपदरीकरण झाल्यापासून या मार्गावर मालगाड्यांची संख्या वाढली आहे. गेट लागल्यास अर्धा पाऊण तास उघडत नाही. त्यामुळे पालखी मार्गावरील वाहतूक ठप्प होत असते. तसेच, दर दोन तीन महिन्यांनंतर हे रेल्वे फाटक कामानिमित्त बंद असते. त्यामुळे रेल्वेमार्गावरून उड्डाणपुलाची मागणी वाढत आहे.