पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील रेल्वे गेट ४८ तास बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 06:30 PM2022-07-07T18:30:10+5:302022-07-07T18:35:01+5:30
सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले...
नीरा (पुणे) : पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर नीरा ते जेजुरी दरम्यान पिसुर्टी येथे असणारे रेल्वे गेट दि. ०८ ते दि.१० या काळात वाहतुकीसाठी ४८ तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. रविवारी दि.१० रोजी पंढरपूर यात्रा असुन त्याआधी दोन दिवस हा मार्ग बंद ठेवल्याने यात्रेकरुंनी व स्थानिकांनी या दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर पिसुर्टी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी शुक्रवार दि. ०८ जुलै सकाळी आठ वाजल्यापासून ते रविवार दि. १० रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी नीरा- मोरगाव - जेजुरी या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
रविवार दि. १० रोज आषाढी एकदशी दिवशी पंढरपुरची यात्रा असते. याच रत्यावरून गेली दहा दिवसांपूर्वी वारकरी पायी पालखी सोहळ्यात चालत गेले आहेत. आता याच मार्गावरून पुढील दोन दिवस पुणे, मुंबई, नाशिक व राज्यभरातून भाविक मिळेल त्या वाहनातून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणार आहेत. मात्र जेजुरी ते नीरा दरम्यानचा पालखी मार्गच रेल्वेने बंद ठेवल्याने भाविकांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे.