पुणे-पंढरपूर मार्गावरील रेल्वे गेट ३६ तास राहणार बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 05:22 PM2023-09-14T17:22:13+5:302023-09-14T17:25:01+5:30
ऐन गणपती सणानिमित्त गावी जाणाऱ्यांना ४० किलोमीटरचा वळसा...
नीरा (पुणे) : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील, पुणे-मिरज लोहमार्गावर, वाल्हे- नीरा दरम्यानचे, थोपटेवाडी (ता.पुरंदर) हद्दीतील रेल्वे गेट शनिवार - रविवारी ३६ तास बंद राहणार असल्याचे रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पुणे मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/०१ रेल्वेफाटक शनिवार (दि. १६) सकाळी ७ ते रविवार (दि.१७) सायंकाळी ७ पर्यंत ३६ तास वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रका द्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी, पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे रूळच्या दुरूस्तीसाठी (रेल आणि स्लीपर बदलण्यासाठी) व निरीक्षणासाठी रेल्वे फाटक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती, रेल्वेच्या वतीने , प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
दरम्यान, सोमवारी वाल्हे व नीरा ग्रामपंचायत कार्यालयास यासंदर्भातील पत्र, रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र, ऐन गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने मुंबई पुण्याहून गावी जाणाऱ्या प्रवाशांना या पालखी महामार्गावरील रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याने, आता जेजुरी येथून मोरगाव व पुन्हा नीरा येथे येऊन पुढिल प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी तब्बल ४० किलोमीटरचा वळसा सर्व प्रवाशांना पडणार आहे.
ऐन गणपती सणांच्या दोन दिवस आगोदर विकएंड काळात रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याने, रेल्वे प्रशासनावर प्रवाशी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत असून, या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी नीरा- मोरगाव- जेजुरी या लांबच्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.