Pune Railway: रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाच पडला ‘रेल नीर’चा विसर; दुकानदारांना जबरदस्ती का?
By नितीश गोवंडे | Published: July 17, 2022 05:25 PM2022-07-17T17:25:42+5:302022-07-17T17:26:05+5:30
रेल नीर सोडून इतर कंपनीच्या बॉटल विकल्यास दंडात्मक कारवाई
पुणे : रेल्वे स्थानकावर फक्त ‘रेल नीर’ विकण्याची सक्ती पुणे रेल्वे विभागाने केलेली असताना पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या कार्यक्रमात स्थानिक कंपनीच्या बाटल्या समोर ठेवण्यात आल्या होत्या. मुळात एकीकडे रेल्वे स्थानकावरील दुकानांमध्ये रेल नीर विकण्याची सक्ती रेल्वे प्रशासनाने केलेली असताना रेल्वेचे अधिकारीच जर रेल नीरचा वापर करत नसतील तर दुकानदारांना बळजबरी का, असा प्रश्न यावरून उपस्थित होत आहे.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत येत्या सोमवारी देशभरातील रेल्वे स्थानकांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे रेल्वे विभागातर्फे पुणे आणि सातारा रेल्वे स्थानकावर आठ दिवस हा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी यावेळी दिली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सोमवारी (१८ जुलै) एकाच वेळी ७७ स्थानकांवर या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाइन केले जाणार आहे. यावेळी अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक बृजेशकुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांची उपस्थिती होती.
दुकानदारांना बळजबरी का?
पुणे रेल्वे विभाग स्टेशनवर फक्त रेल नीर या कंपनीच्या पाणी बॉटल विकण्यास परवानगी देते. स्टेशनवरील विक्रेत्यांनी रेल नीर या कंपनीच्या बॉटल सोडून इतर कंपनीच्या बॉटल विकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मग पुणे रेल्वे विभागाच्या कार्यक्रमात जर इतर कंपनीच्या बॉटल दिसत असतील. विक्रेत्यांना रेल नीरच्या बॉटल विकण्याची जबरदस्ती का केली जाते. असा सवाल विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.