रेल्वे प्रवाशांची डोकेदुखी वाढणार! जाणून घ्या पुण्यातून धावणाऱ्या कोणत्या गाड्यांना किती उशीर…
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 04:53 PM2024-11-26T16:53:29+5:302024-11-26T17:03:48+5:30
पुणे रेल्वे स्थानकावरून सध्या लांब पल्ल्यांच्या सुटणाऱ्या गाड्यांना उशीरा धावत आहे
पुणे : पुणेरेल्वे विभागातून दररोज २०० रेल्वे गाड्या धावतात. त्यामधून साधारण रोजचे पावणे दोन लाख प्रवासी ये-जा करतात. रेल्वेकडून ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये दिवाळी व छटसाठी ३०० पेक्षा जास्त विशेष रेल्वे गाड्या सोडल्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली होती. विविध मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे अनेक गाड्यांचे वेळापत्रक सणांच्या काळात बिघडले होते.
मात्र आता सणाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक जागेवर येईल अशी प्रवाशांना आशा होती. पण, अद्याप ही रेल्वेचे वेळापत्रक काही जागेवर आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरून सध्या लांब पल्ल्यांच्या सुटणाऱ्या गाड्यांना उशीरा धावत आहेत. चार तासांपासून ते आठ तासांपर्यंत गाड्यांना उशीर होत असल्याचे गेल्या चार दिवसांपासून चित्र दिसत आहे. तर यामध्ये नियमित सुटणाऱ्या गाडया तर काही गाड्या विशेष होत्या. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर काही तास ताटकळत थांबावे लागले.
या गाड्यांचे येणारे रेक उशीरा पोहचल्यामुळे त्यांना उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर सोमवारी देखील दोन गाड्यांना उशीर झाल्याचे दिसून आले. पुण्यातून सुटणाऱ्या गाड्यांबरोबरच पुण्यात येणाऱ्या गाड्यांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना गाडीत जास्त वेळ जात आहे. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
'या' आहेत उशीर झालेल्या 'रेल्वे गाड्या'
गाडीचे नाव - उशीर झालेला कालावधी
- पुणे-मुझ्झफरपूर - आठ तास
- पुणे-नांदेड - चार तास
- हडपसर-झांशी विशेष - सहा तास
- पुणे-मालदा विशेष - साडेपाच तास
- पुणे नागपूर - नऊ तास
- पुणे हंरगुळ - सहा तास
- पुणे हमसफर एक्स्प्रेस -आठ तास
- पुणे नागपूर - अडीच तास