'तो' देवदूत बनून आला, पाय घसरून पडलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलिसाने वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:42 PM2022-06-25T13:42:50+5:302022-06-25T13:44:35+5:30

क्षणाचाही विलंब न करता कृती केल्याने वाचले प्राण...

railway police rescued the life of a passenger who slipped through the railway door | 'तो' देवदूत बनून आला, पाय घसरून पडलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलिसाने वाचवले प्राण

'तो' देवदूत बनून आला, पाय घसरून पडलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलिसाने वाचवले प्राण

Next

पुणे : सांगली येथून पालखीच्या दर्शनासाठी आलेला प्रवासी रेल्वेने परत जात असताना दरवाजातून पाय घसरल्याने रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला. ही बाब रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाच्या निदर्शनास येताच त्यांनी वेळीच मदतीला धावून जात त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. २२ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. रविकांत नेमिनाथ ढोले (६०, रा. कवलापूर रोड, कोडके मळा, मु. पोस्ट बामणोली, कुपवाड, एमआयडीसी परिसर, सांगली) असे या प्रवाशाचे नाव असून, रेल्वेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रतन सिंग असे मदत करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत ढोले यांनी पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी कोकणकन्या रेल्वेचे रिझर्वेशन केलेले होते. ते पुण्यात पालखीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन करून ढोले पुन्हा रेल्वेस्थानकावर आले. त्याआधी दोन दिवसांपासून त्यांची झोप झालेली नव्हती. रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्र. २ वर रेल्वेची वाट बघत असताना त्यांना झोप लागली. मुंबईहून कोकणकन्या पुणे स्थानकावर आली आणि गाडी निघत असताना ढोलेंना जाग आल्याने त्यांनी पळत रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी रेल्वेच्या दरवाजातून त्यांचा पाय घसरल्याने ते रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकले.

रेल्वे हळूहळू वेग घेत असताना ही घटना घडल्याने प्लॅटफॉर्मवर गस्त घालत असताना रतन सिंग यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ढोले यांना बाहेर काढत, शिवाजीनगर रेल्वे पोलीस चौकीत नेले. यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

Web Title: railway police rescued the life of a passenger who slipped through the railway door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.