लोहमार्ग पोलिसांनी चार किलोमीटर झोळीत नेऊन वाचविले महिलेचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:52+5:302021-06-03T04:09:52+5:30
आशा दाजी वाघमारे (वय ४२, रा. ता. मावळ) असे या महिलेचे नाव असून तिच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. ...
आशा दाजी वाघमारे (वय ४२, रा. ता. मावळ) असे या महिलेचे नाव असून तिच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. जांबरूंग येथे रेल्वे लाईन ओलांडत असताना धावत्या रेल्वे गाडीची धडक लागल्याने मणक्याला मार लागून आशा वाघमारे गंभीर जखमी झाल्या होत्या.
पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लोणावळा स्टेशन मास्तर यांनी कळविले की, जांबरूंग रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक महिला जखमी अवस्थेत पडलेली आहे. लोणावळा लोहमार्ग दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस नाईक जाधव व चार हमाल मालगाडीच्या इंजिनमध्ये बसून घटनास्थळी रवाना झाले. वाहतुकीचे साधन नसताना देखील कर्मचाऱ्यांनी जखमी महिलेस झोळीमध्ये उचलून ४ किलोमीटर अंतर पायी चालत पार केले. पळसदरी रेल्वे स्टेशन येथून रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला कर्जत येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.