रेल्वे पोलिसांनी तब्बल चार किलोमीटर झोळीत नेऊन वाचविले महिलेचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 10:06 AM2021-06-03T10:06:22+5:302021-06-03T10:06:37+5:30
आशा दाजी वाघमारे (४२) असे या महिलेचे नाव आहे. जांबरुंग येथे रेल्वेलाइन ओलांडत असताना धावत्या रेल्वे गाडीची धडक लागल्याने मणक्याला मार लागून आशा वाघमारे गंभीर जखमी झाल्या होत्या.
लोणावळा (पुणे) : रेल्वे ट्रॅकजवळ जखमी अवस्थेत पडलेल्या एका महिलेला लोहमार्ग पोलिसांनी तब्बल ४ किमी अंतरापर्यंत झोळीमध्ये उचलून नेत तिचे प्राण वाचविले. जांबरुंग येथे ३१ मे रोजी ही घटना घडली होती.
आशा दाजी वाघमारे (४२) असे या महिलेचे नाव आहे. जांबरुंग येथे रेल्वेलाइन ओलांडत असताना धावत्या रेल्वे गाडीची धडक लागल्याने मणक्याला मार लागून आशा वाघमारे गंभीर जखमी झाल्या होत्या.
जांबरुंग रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक महिला जखमी अवस्थेत असल्याची माहिती लोणावळा स्टेशन मास्तर यांनी दिल्यानंतर लोणावळा लोहमार्ग दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस नाईक जाधव व चार हमाल मालगाडीच्या इंजिनमध्ये बसून घटनास्थळी रवाना झाले. वाहतुकीचे कोणतेही साधन नसताना कर्मचाऱ्यांनी जखमी महिलेस झोळीमध्ये उचलून ४ किलोमीटर अंतर पायी चालत पार केले. पळसदरी रेल्वेस्टेशन येथून रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला कर्जत येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांनी दिली.