लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले कोट्यवधींचे सोने
By admin | Published: March 9, 2017 04:28 AM2017-03-09T04:28:07+5:302017-03-09T04:28:07+5:30
चेन्नई-कुर्ला एक्स्प्रेसच्या एसी बोगीमधून वाहतूक करण्यात येत असलेले तब्बल १५ किलो ५६० ग्रॅम वजनाचे ४ कोटी ३८ लाखांचे सोने लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहे.
पुणे : चेन्नई-कुर्ला एक्स्प्रेसच्या एसी बोगीमधून वाहतूक करण्यात येत असलेले तब्बल १५ किलो ५६० ग्रॅम वजनाचे ४ कोटी ३८ लाखांचे सोने लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहे. लोहमार्ग पोलिसांनी मालकाला समजपत्र देऊन चौकशीसाठी बोलावले असून याबाबत प्राप्तिकर विभागालाही कळविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांनी दिली.
पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास चेन्नई-कुर्ला एक्सप्रेस लागली होती. तपासणीदरम्यान गाडीच्या एसी बोगीमध्ये दोन प्रवासी संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांच्या साहित्याची तपासणी करण्यात आली. त्यांच्याजवळील बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आढळून आले. याबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मिळून आली नाहीत.
पोलिसांनी हे दागिने ताब्यात घेतले असून निगराणीत ठेवले आहेत. सुमेर मुकन सिंह (वय ३२, रा. राजस्थान), हरिओम पुरुषोत्तम पारीक (वय ३०, रा. राजस्थान) अशी प्रवाशांची नावे आहेत.
सोने मालकास याबाबत समजपत्र देण्यात आले आहे. त्याला पुढील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
ही कारवाई अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, उपविभागीय अधिकारी तुकाराम वहिले यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक संजय सातव, सहायक निरीक्षक हिंमत माने पाटील, सहायक फौजदार बाबासाहेब ओंबासे, संतोष लाखे, मिलिंद आळंदे, भीमाशंकर बमनाळीकर, गणेश शिंदे, कैलास जाधव यांच्या पथकाने केली.