रेल्वे क्वार्टर बांधण्याचे कंत्राट मिळाल्याचे सांगून २५ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:05 PM2018-04-28T13:05:55+5:302018-04-28T13:05:55+5:30
रेल्वेचे क्वॉर्टर बांधण्याचे कंत्राट मिळाल्याचे मिळाले आहे. तुम्ही यात पैसे गुंतवले तर मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील असे आरोपींनी फिर्यादींना सांगितले.
पुणे : रेल्वे कर्मचा-यांसाठी असलेले क्वॉर्टर बांधण्याचे कंत्राट मिळाल्याचे असे दोन भावांना सांगण्यात आले. त्यात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत दोन भावांना त्यात पैसे गुंतविण्यास भाग पाडून त्यांची २५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मेघराज उत्तमराव निंबाळकर (वय ४२, रा. लक्ष्मीनारायण टॉवर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एस. आर. एंटरप्रायजेसचे रविंद्र तिवारी तसेच अथर्व कन्स्ट्रक्शनचे सचिन लेले यांच्यासह चौघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा प्रिटींगचा व्यावसाय आहे. तर, आरोपी हे कंत्राटदार आहेत. फिर्यादी व त्यांची २०१२ मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी रेल्वेचे क्वॉर्टर बांधण्याचे कंत्राट मिळाल्याचे मिळाले आहे. तुम्ही यात पैसे गुंतवले तर मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील असे आरोपींनी फिर्यादींना सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी १३ लाख ४५ हजार रुपये घेतले. तर, त्यांचे भाऊ पृथ्वीराज निंबाळकर यांच्याकडूनही १२ लाख ५ हजार रुपये घेतले. मात्र, अनेक महिन्यांनंतरही फिर्यादींना रेल्वे क्वॉटरबाबात माहिती मिळाली नाही. याबाबत त्यांनी आरोपींकडे विचारणी केली. मात्र, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निंंबाळकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहेत.