रेल्वेचा स्लीपर कोच झाला जनरल! निवडणूक, सुट्यांमुळे तुफान गर्दी, सर्वच श्रेण्यांचे आरक्षण फुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 01:23 PM2024-05-03T13:23:04+5:302024-05-03T13:23:37+5:30
आरक्षण करूनही बसायला जागा नसल्याने रेल्वेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे....
पुणे : लग्नसराई व उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे सर्व रेल्वेगाड्यांचे स्लीपर, एसीसह सर्वच श्रेण्यांचे आरक्षण जूनअखेर फुल्ल झाले आहे. सुट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणेरेल्वे विभागाने आतापर्यंत २५० पेक्षा जास्त नवीन गाड्या सोडल्या आहेत. अनेक जण राज्याबाहेर जाणार आहेत. बहुतेकांनी डिसेंबर, जानेवारीतच प्रवासाचे नियोजन करून तिकिटांचे २ टिअर, ३ टिअर, एसी, स्लीपर कोच असे आरक्षण केले आहे. बसच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास वेगवान, स्वस्त व आरामदायी असल्याने बहुतेकांचा कल रेल्वेकडे असतो. मात्र, आता रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने रेल्वे प्रवासही गैरसोयीचा होत आहे. आरक्षण करूनही बसायला जागा नसल्याने रेल्वेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
दोन महिन्यांपूर्वी तिकीट बुकिंग करूनही प्रवाशांचा हिरमोड होत आहे. आरक्षण करूनही स्लीपर कोच डब्यात गर्दी तुफान झाल्याने ये - जा करणेही अवघड होत आहे. तिकीट काढूनही जनरल डब्यासारखी गर्दी झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वेच्या पुणे विभागातून एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या गर्दीच्या हंगामात विशेष गाड्यांच्या २४६ फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. तरी या गाड्यांमध्ये प्रवाशांना बसण्यासही जागा नसल्याचे चित्र आहे. पंधराशे ते सोळाशे प्रवाशांची क्षमता असलेल्या गाडीत अडीच ते तीन हजार प्रवासी जात आहेत. परिणामी, रेल्वेच्या महसुलात वाढ होत आहे. मात्र, नागरिकांना चेंगराचेगरी करत प्रवास करावा लागत आहे. काही प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना
- गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी अतिरिक्त कर्मचारी
- रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रणाची व्यवस्था
- रेल्वे स्थानकावर अतिरिक्त तिकीट तपासनीस तैनात
सध्या रेल्वेत प्रचंड गर्दी होत आहे. आरक्षण करूनही प्रवाशांना सुखाचा प्रवास करता येत नाही. आरक्षण तिकीट फुल असतानाही वाढत्या गर्दीमुळे प्रवासी स्लीपर डब्यात बसत आहेत. एसी, स्लीपर डब्यात जनरल प्रवासी बसत असल्याने नियोजन करून प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पुणे रेल्वे विभागाने सुरक्षा वाढवून या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे.
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप