रेल्वे कर्मचाऱ्यांचाच ‘रेल रोको’
By admin | Published: November 14, 2015 03:03 AM2015-11-14T03:03:23+5:302015-11-14T03:03:23+5:30
रेल्वे स्थानक परिसरात लूटमारीच्या घटना वाढत असून आठवडाभारात दोन रेव्ले कर्मचाऱ्यांना मारहाण करून लूटण्यात आले
दौंड : रेल्वे स्थानक परिसरात लूटमारीच्या घटना वाढत असून आठवडाभारात दोन रेव्ले कर्मचाऱ्यांना मारहाण करून लूटण्यात आले. त्यामुळे संतप्त रेल्वेचालकांनी शुक्रवारी दौंड-पुणे शटलसेवा सुमारे ३० मिनिटे रोखून धरली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रेल्वेचालक पंकजकुमार मालगाडी घेऊन पुणतांब्याला जाणार होते. त्यासाठी ते आपल्या घरून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी पायी निघाले होते. रेल्वेस्थानकाच्या परिसरात दुचाकीवर दोघे जण आले. त्यांनी तोंडाला फडके बांधले होते. त्यातील एकाने लोखंडी रॉड काढला आणि पंकजकुमार यांच्या हातावर आणि पायावर मारला. दुसऱ्याने चाकू काढून म्हणाला, ‘‘आवाज केलास तर भोसकून टाकेल. हा सर्व संवाद चोरटे हिंदीतून करीत होते. या वेळी पंकजकुमार यांच्याकडून एक हजार रुपये, मोबाईल, बॅग हिसकावून घेतली. या बॅगेत एटीएम कार्ड, मतदान कार्ड यांसह महत्त्वाची कागदपत्रे होती.
ही घटना रेल्वे पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक शाम पवरे अधिक तपास करीत आहेत.
गेल्या आठवड्यात रेल्वेस्थानक परिसरात शस्त्राचा धाक दाखवून तिकीट तपासणीसाची लूटमार केली होती. तीन दिवसांपूर्वी दोन केळी विके्रत्यांनी एका प्रवाशाला फलाट नं. ५ वर मारहाण केली होती.
आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषधार्थ रेल्वेचालकांनी दौंड-पुणे शटलसेवा सुमारे ३० मिनिटे रोखून धरली. जोपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळत नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही. या पवित्र्यावर रेल्वे कर्मचारी ठाम होते. त्यानंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी ती गाडी पुढे जाण्यासाठी सहकार्य केले.
रेल्वे स्थानक परिसरातील
वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)
1दौंड येथे रेल्वेचालकाची पहाटे साडेपाचच्या सुमारास लूटमार झाली. त्यानंतर पुढे बोरावकेनगर परिसरात एका टॅ्रक्टरचालकाला मारहाण करण्यात आली. एका मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीची लूटमार करीत असताना काही वाहने येत असल्याचे लक्षात येताच हे चोरटे पळून गेले. ही घटना पहाटे सहाच्या सुमारास घडली. या वेळी दोघेही चोरटे दुचाकीवर होते. रेल्वेचालकाची लूटमार करणारेदेखील दोघे दुचाकीवर होते. या तिन्ही घटना याच चोरट्यांनी केल्या असल्याची शक्यता आहे.