रेल्वे स्थानकाचा ‘कारभार’ खासगी कंपनीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 01:08 PM2018-12-27T13:08:54+5:302018-12-27T13:21:53+5:30
फलाट तिकीट देण्यासह रेल्वे स्थानकावरील स्वच्छता, पार्किंग सुविधा, कॅन्टीनसह सर्व कामे कंपनीकडे सोपविण्यात आली आहेत.
पुणे : रेल्वे तिकीट व गाड्या सोडण्याचे दैनंदिन कामकाज वगळता पुणेरेल्वे स्थानकावरील बहुतेक कामे खासगी कंपनीकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फलाट तिकीट देण्यासह रेल्वे स्थानकावरील स्वच्छता, पार्किंग सुविधा, कॅन्टीनसह सर्व कामे कंपनीकडे सोपविण्यात आली आहेत.
पुणे विभागीय रेल्वेच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आदी उपस्थित होते. देशातील महत्वाच्या ६८ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये पुणे स्थानकाचाही समावेश आहे. ही जबाबदारी इंडियन रेल्वे स्टेशन्स डेव्हलपमेंट कापोर्रेशनवर (आयआरएसडीसी) सोपवण्यात आली आहे. याअंतर्गत आयआरएसडीसीने पुणे स्थानकातील विविध कामांसाठी भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या कंपनीची नियुक्ती केली आहे.
प्रामुख्याने रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. तसेच प्रवाशांना अधिक चांगल्याप्रकारे सुविधा पुरविण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. याअनुषंगाने आयआरएसडीसीने तीन वर्षांसाठी बीव्हीजी कंपनीची निवड केली आहे. सध्या स्वच्छतेपासूनची सर्व कामे रेल्वेकडून केली जातात. पण यापुढे पुणे रेल्वे स्थानक व परिसर, कॅन्टीन, पार्किंगची सुविधा, शुल्क आकारणी यांसह विविध कामे कंपनीवर सोपविण्यात आली आहेत. फलाट तिकीटही या कंपनीकडूनच वितरीत केली जातील. रेल्वे प्रशासनाकडे फलाट तिकीट वगळून सर्व तिकीटे देणे व रेल्वेच्या दैनंदिन संचलनाची जबाबदारी असेल. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, खासगी कंपनीला ही कामे देण्यात आल्याने रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
------------
दृष्टीक्षेपात रेल्वे स्थानक
-फलाक क्रमांक एकवर अधिक प्रकाशमान दिवे बसविणार
-आठवडाभरात नवीन वातानुकूलित विश्रांती कक्ष
- पाच सरकते जिने
-महात्मा गांधी पुतळ्याजवळ शंभर फुट उंचीचा ध्वजस्तंभ उभारणार
-फलाट ४ व ५ वर ग्रेनाईट बसविणार