Pune | मावळातील ५० गावांना जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग झाला खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 05:02 PM2023-02-18T17:02:56+5:302023-02-18T17:05:01+5:30
खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण...
वडगाव मावळ (पुणे) : आंदरमावळातील सुमारे ५० गावांना जोडणारा व गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या जांभूळ गेट क्रमांक ४७ भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून जांभूळ भुयारी मार्गचे काम सुरू झाले होते. आंदरमावळातील मावळमधील टाकवे, वडेश्वर, माऊ, नागाठली, कुसवली, बोरिवली डाहुली, खांडी, सावळा, माळेगाव, इंगळून, किवळे, कशाळ, भोयरे, फळणे, कोंडीवडे, काल्हाट, निगडे आदी गावांतील ग्रामस्थांना, शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक, कामगार यांचा प्रवास या भुयारी मार्गामुळे कमी वेळात व सुखकर होणार आहे. कान्हे व जांभूळ येथे रेल्वे गेट असल्यामुळे ये-जा करण्यासाठी ट्रॅफिकमुळे अडचण व वेळ वाया जात होता. त्यामुळे अनेक अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते.
हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाला नेताना रेल्वे गेट बंद असल्यामुळे विलंब झाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटनादेखील घडल्या होत्या. आता भुयारी मार्गामुळे टाकवे व कान्हे जांभूळ येथील कंपनी कामगारांना वेळेत कामावर जाता येणार आहे. कान्हे रेल्वे गेटवर यामुळे ट्रॅफिक कमी होणार आहे. भुयारी मार्गाच्या कामाचा पाठपुरावा शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांच्यासह या भागातील ग्रामस्थांनी केल्यामुळे भुयारी मार्गाचे काम लवकर मार्गी लागले.
यावेळी रिपाइंचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत वाघमारे, कामगार नेते इरफान सय्यद, शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, सरपंच नागेश ओव्हाळ, उपसरपंच एकनाथ गाडे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, नितीन कुडे, गिरीश सातकर, टाकवेच्या सरपंच सुवर्णा असवले, माजी सरपंच भूषण असवले यांच्यासह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.