सुट्टीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ‘रेल्वे फुल्ल’; आता प्रवाशांना लागले उन्हाळी सुट्टीचे वेध
By अजित घस्ते | Published: March 29, 2024 06:53 PM2024-03-29T18:53:31+5:302024-03-29T18:54:06+5:30
पुणे हे शहर उद्योग, शिक्षण तसेच ऐतिहासिक ठिकाण असल्याने येथे पर्यटकांची मोठी रेलचेल असते
पुणे : प्रवाशांना उन्हाळी सुट्टीचे वेध आतापासून लागले असून, पुणे विभागातून धावणार्या प्रमुख गाड्यांचे तिकीट पुढील दोन-अडीच महिने म्हणजे जूनपर्यंत फुल्ल झाले आहे. परिणामी ऐनवेळी सुट्टीच्या हंगामात प्रवासाचा बेत करणार्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तसेच उन्हाळ्यात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता, काही एजंटांकडून भरमसाट तिकीट बुकिंग करून काळाबाजार करण्याचा प्रकारही नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी आवाहन पेलावे लागणार आहे.
पुणे हे शहर उद्योग, शिक्षण तसेच ऐतिहासिक ठिकाण असल्याने येथे पर्यटकांची मोठी रेलचेल असते. तसेच पुण्यात बाहेरील राज्यातून कामानिमित्त व नोकरीसाठी ये-जा करणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरून दररोज किमान दीड ते दोन लाख प्रवासी प्रवास करत असतात. परिणामी एसटी बससह रेल्वे प्रवासाला अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याने येथून तिरुपतीसह मुंबई, दिल्ली, दानापूर, कोलकाता, चेन्नई, गोरखपूर आदी महत्त्वपूर्ण शहरांत रेल्वेसेवा सर्व प्रवाशांसाठी किफायतशीर आहे. सध्या दहावी, बारावीची परीक्षा झाल्या आहेत. तर शालेय परीक्षा पूर्ण होण्यास अजून किमान पंधरा-वीस दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत बाहेर फिरायला जाणार्या प्रवाशांचे नियोजन सुरू झाले आहे. आतापासूनच साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रमुख रेल्वेगाड्यांचे तिकीट बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परीक्षांनंतर बाहेर पर्यटनास जाणार्या पर्यटकांच्या रेल्वे सुविधेचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या आहेत प्रमुख गाड्या...
पुण्यातून उत्तरेकडे धावणाऱ्या जम्मू-तावी झेलम एक्स्प्रेस, दानापूर एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस या सर्व गाड्यांना १५ जूनपर्यंत जवळपास शंभर ते दोनशेपर्यंत वेटिंग आहे. तर, मुंबईतून सुटणार्या व दक्षिणेकडे जाणार्या कन्याकुमारी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस, त्रिवेंद्रम एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस या प्रमुख गाड्यांना साधारणपणे २० मे पर्यंत तिकीट फुल्ल आहे.